लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): शेतातील धुरा जाळत असताना अचानक अंगावरील कपड्यांनी पेट घेतल्याने एक शेतकरी भाजून जखमी झाल्याची घटना २ मे रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आडगाव शिवारात घडली.तालुक्यात शेतीच्या मशागतीची कामे सुरु झाली आहेत. आडगाव येथे रंगनाथ भुसनर (३०) हे शेतातील काडी-कचरा जाळून टाकत होते. तसेच धुऱ्यावर मोठ्या प्रमाणात गवत वाढल्याने त्यांनी हे गवत पेटवून दिले. गवताने पेट घेतल्यानंतर आगीच्या ज्वाला वाढल्या. त्यातच रंगनाथ भुसनर यांच्या अंगावरील कपड्यांनीही पेट घेतला. या घटनेनंतर भूसनर यांनी आरडाओरड करताच शेजारील शेतकरी मदतीसाठी धावून आले. भूसनगर यांच्या अंगावर माती टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु, भूसनर हे गंभीररित्या भाजल्या गेले.जखमी झालेल्या भुसनर यांना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविले आहे.या घटनेत रंगनाथ भुसनर हे ५५ ते ६० टक्के भाजले असल्याची माहिती मिळाली.
परभणी : धुरा जाळताना शेतकरी भाजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 12:08 AM