परभणी : सोयाबीन पीक विमा प्रकरणी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रिलायन्स विमा कंपनीच्या व्यवस्थापक व संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीने आज काढलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी संघटनांच्या संघर्ष समितीच्या वतीने आज दुपारी १ वाजता शनिवार बाजार येथील मैदानातून मोर्चा काढण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गावरुन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाभरातील शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा दरम्यान विमा कंपनीबरोबरच सत्ताधारी शासनाविरुद्धही घोषणाबाजी करण्यात आली.
जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावणे तीन लाख शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा उतरविला आहे. कंपनीने जिल्ह्यातून सोयाबीनच्या विमा हप्त्यापोटी १७३ कोटी रुपये वसूल केले. जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे नुकसान झालेले असतानाही कंपनीने नुकसान भरपाईपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले. त्यामुळे विमा कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली, असा आरोप करीत कंपनीच्या व्यवस्थापक व संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तसेच सोयाबीन विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार रुपये व सोयाबीन पीक विमा भरपाई द्यावी.
कापूस, तूर, मूग या पिकांसाठीही विमा भरपाई द्यावी, बोंडअळीचे अनुदान हेक्टरी ४० हजार रुपये अदा करावे, जिल्ह्यातील सर्व बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा उपलब्ध करावा, दुष्काळ जाहीर करण्याचे नवीन निकष रद्द करावेत, कृषीपंपासाठी मोफत वीज द्यावी, शेतकऱ्यांना सात-बारा कोरा करावा आदी मागण्या आंदोलनाद्वारे करण्यात आल्या. शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक राजन क्षीरसागर व माणिक कदम यांच्य नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चात जिल्ह्यातील शेतकरी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.