लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : तालुक्यातील पोहेटाकळी येथील जलस्त्रोत आटले असून, पाणीपुरवठा योजनेची विहीरही कोरडीठाक पडली आहे़ परिणामी, ग्रामस्थांना दोन-तीन किमीची पायपीट करून पाणी आणावे लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे़यावर्षी तालुक्यामध्ये अत्यल्प पर्जन्यमान झाले़ परतीच्या पावसानेही तालुक्याकडे पाठ फिरविली़ परिणामी, राज्य शासनाने या तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर केला़ पाथरी तालुक्यातील पोहेटाकळी येथील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यासाठी काही वर्षापूर्वी भारत निर्माण योजनेंतर्गत ३० लाख रुपयांचा खर्च करून विहीर व जलकुंभ उभारण्यात आले़ या योजनेद्वारे आतापर्यंत ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात येत होता़ त्यातच पावसाळ्यात पाऊस झाला नसल्याने एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींनी तळ गाठला आहे़ त्याचबरोबर गावामध्ये सार्वजनिक ९ हातपंप आहेत़ हे हातपंपही आटले आहेत़ परिणामी, गावातील ग्रामस्थांना कामधंदा सोडून गेल्या काही दिवसांपासून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ रोजंदारीवर उपजीविका भागविणाऱ्या ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत. गावातील बहुतांश ग्रामस्थांनी २० एप्रिल रोजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी़एस़ बायस यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली; परंतु, गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांना गावानजीकचे ५०० मीटर अंतरावरील पाण्याचे स्त्रोत ताब्यात घेण्यात यावेत, असे सांगितले आहे़ प्रत्यक्षात अद्यापपर्यंत कोणतीही पाण्याची सुविधा ग्रामस्थांना करून देण्यात आली नाही़ परिणामी, भर उन्हात ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने याकडे लक्ष देऊन ग्रामस्थांसाठी पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे़तातडीने उपाययोजना करण्याची गरजच्पाथरी तालुक्यातील पोहेटाकळी येथील जलस्त्रोत आटल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी २ ते ३ किमीची पायपीट करावी लागत आहे़ गावातील जलस्त्रोत आटल्याने ५०० मीटरमधील पाण्याचे स्त्रोत अधिग्रहणासाठी उपलब्ध होणार नाहीत़ त्यामुळे पंचायत समिती प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन टँकर सुरू करून ग्रामस्थांची तहान भागवावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे़च्एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या तीव्र झळांना सामोरे जावे लागत आहे़ त्यामुळे जून महिन्यापर्यंत ग्रामस्थांना पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागणार आहे़ त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कायमस्वरुपी पाणीपुरवठ्यासाठी पावले उचलावीत, अशी अपेक्षा ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे़
परभणी : पोहेटाकळीत तीव्र पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 11:33 PM