लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत टाकळगव्हाण ते सारोळा (बु) या रस्त्याचे काम मंजूर होऊनही सुरु केले नाही. त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित सुरु करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी गुरुवारी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत टाकळगव्हाण ते सारोळा (बु) या अडीच किमी रस्त्यासाठी १ कोटी ७१ लाख रुपयांचे काम मंजूर होऊनही ठेकेदाराने काम सुरु केले नाही. हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा, यासाठी ग्रामस्थ अनेक दिवसांपासून संघर्ष करीत आहेत; परंतु, अद्यापतरी रस्ता दुरुस्त झाला नाही. आता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत हा रस्ता मंजूर झाला असून, रस्त्यासाठी १ कोटी ७१ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. अनुसया कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले आहे. कामाचे ३ आॅगस्ट २०१९ रोजी कार्यारंभ आदेश मिळाले आहेत. मात्र सात महिने झाले तरी काम सुरु झाले नाही. या संदर्भात ग्रामस्थांनी २० फेब्रुवारी रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. या आंदोलनात अॅड. अशोक पोटभरे, दत्ता बुलंगे, अविराज टाकळकर, विकास बुलंगे, नाना टाकळकर, दिलीप ठोसरे, सुरेश बुलंगे, गोपीनाथ कदम, नाना तायनक, गणेश बुलंगे, मुरली बुलंगे, सिद्धेश्वर बुलंगे आदींचा समावेश होता. लाक्षणिक उपोषण सुरु झाल्याचे कळताच अनुसया कन्स्ट्रक्शन कंपनीने उपोषणस्थळी भेट दिली. २६ फेब्रुवारी पासून रस्त्याचे काम सुरु करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
परभणी : रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:48 AM