लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत असलेला मुळ ७० खाटांचा स्त्री रुग्ण विभाग गेल्या १२ वर्षांपासून गायब झाला असून त्या जागी मंजूर झालेले ६० खाटांचे स्त्री रुग्णालय सुरु केल्याची गंभीर बाब नोव्हेंबर २०१७ मध्ये जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या केंद्र शासनाच्या सीआरएम पथकाच्या चौकशीत समोर आली आहे.परभणी येथे तत्कालीन आरोग्यमंत्री दिवंगत डॉ.विमल मुंदडा यांनी जुलै २००५ मध्ये स्वतंत्र स्त्री रुग्णालयास मंजुरी दिली होती. या संदर्भातील निर्णय २००६ मध्ये काढण्यात आला. या स्त्री रुग्णालयासाठी एकूण ८२ अस्थायी पदांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये १ वैद्यकीय अधिक्षक, १० वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक आधीसेविकास १, परिसेविका ५, अधिपरिचारिका २०, बालरोग परिचारिका, आहार तज्ज्ञ प्रत्येकी १, क्ष-किरण तज्ज्ञ, प्रयोगशाळा तज्ज्ञ प्रत्येकी २, औषध निर्माता ३, भांडारपाल, मुकादम, प्रयोगशाळा परिचर, क्ष-किरण परिचर, सहाय्यक स्वयंपाकी, कार्यालयीन अधीक्षक असे प्रत्येकी एक पद मंजूर करण्यात आले. तसेच शस्त्रक्रियागृह परिचर ३, कक्ष सेवक ८, सफाईगार १०, शिपाई ३, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, बाह्यरुग्ण लिपीक प्रत्येकी २ अशा ८२ पदांचा समावेश आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी ६० खाटांचे स्वतंत्र स्त्री रुग्णालय मंजूर झाले असले तरी तत्पूर्वी जिल्हा रुग्णालयात ७० खाटांचा स्त्री रुग्ण विभाग (मॅटर्निटी वॉर्ड) होता.स्त्री रुग्णालय मंजूर झाल्यानंतर या स्त्री रुग्णालयाची स्वतंत्र इमारत बांधून तेथे हे रुग्णालय कार्यान्वित करणे अपेक्षित असताना जागेची अडचण सांगून तशी कोणतीही कारवाई न करता जिल्हा रुग्णालयातच स्त्री रुग्णालयाचा कारभार सुरु करण्यात आला आणि जिल्हा रुग्णालयांतर्गत असलेला स्त्री रुग्ण विभाग बंद करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्याला पूर्वी मंजूर असलेल्या ७० खाटांचा विभाग अचानक गायब झाला आणि ६० खाटांचे रुग्णालय सुरु झाले. त्यानंतर २०१० मध्ये शनिवार बाजार परिसरात स्त्री रुग्णालयासाठी स्वतंत्र इमारत बांधण्यात आली; परंतु, त्या इमारतीचा स्त्री रुग्णालयासाठी वापर न करता तेथे २० खाटांचे नेत्र रुग्ण वॉर्ड सुरु करण्यात आले.जिल्हा सामान्य रुग्णालयातील ७० खाटांचा स्त्री रुग्ण वॉर्ड गायब झाल्याची बाब ६ ते ८ नोव्हेंबर २०१७ दरम्यान जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या केंद्र शासनाच्या डॉ.शुक्ला यांच्या अध्यक्षतेखालील सीआरएम पथकाच्या चौकशी दरम्यान समोर आली. या पथकाचे ज्यावेळी बारकाईने चौकशी केली, त्यावेळी परभणीकरांचीच फसवणूक झाल्याचे समोर आले. शिवाय या पथकाने जेथे नेत्र विभाग सुरु केला आहे, ती जागा देखील योग्य नसल्याचे सांगितले होते. तशी गंभीर नोंद या समितीने केंद्र शासनाला सादर केलेल्या अहवालात केली आहे. परभणीकरांसाठी असलेला पूर्वीचा ७० खाटांचा स्त्री रुग्ण विभाग गायब केला गेला. त्या विभागांतर्गत कार्यरत असलेले अधिकारी- कर्मचारी कोठे काम करतात, याचाही पत्ताच नाही. शिवाय नव्याने मंजूर झालेल्या ६० खाटांचे स्त्री रुग्णालयाचे कामकाज ७० खाटांच्या वॉर्डमध्ये सुरु करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्याला स्त्री रुग्णांसाठी एकूण १३० खाटांची व्यवस्था उपलब्ध होण्याऐवजी ६० खाटांचीच व्यवस्था उपलब्ध झाली. ही बाब आतापर्यंत आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या लक्षात कशी काय आली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. गेल्या १२ वर्षांपासून हा प्रकार सुरु असताना त्याकडे दुर्लक्ष करणाºया या कालावधीतील सर्व जिल्हा शल्यचिकित्सकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.स्त्री रुग्णालयात एकाच खाटेवर दोन रुग्णजिल्हा रुग्णालयातील स्त्री रुग्ण विभाग गायब करुन त्या जागी सुरु करण्यात आलेल्या स्त्री रुग्णालयात येणाºया रुग्णांची संख्या चार पटीने वाढली आहे. त्यामुळे उपलब्ध एका बेडवर दोन रुग्णांना उपचार घ्यावे लागतात. शिवाय या विभागात साफसफाईचाही अभाव दिसून येतो. शिवाय या स्त्री रुग्णालयाची बकाल अवस्था पाहून सीआरएम पथकातील डॉ.शुक्ला यांनीही संताप व्यक्त केला होता. या बाबी आता या पथकाचा अहवाल समोर आल्यानंतर उघड होऊ लागल्या आहेत.स्त्री रुग्णालय शनिवार बाजारात हलवण्याची गरजपरभणीतील स्त्री रुग्णालयाला स्वतंत्र इमारत मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. गेल्या महिन्यात राज्याचे आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत जिल्ह्याच्या दौºयावर आले होते. त्यावेळी त्यांनी सहा महिन्यात या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे सांगितले होते. परंतु, प्रशासकीय पातळीवर होणारी दिरंगाई आणि पाठपुराव्यांबाबत स्थानिक अधिकाºयांकडून घेतली जाणारी तकलादू भूमिका यामुळे सहा महिन्यात हे काम पूर्ण होईल, याबाबत परभणीकरांना बिलकूल खात्री वाटत नाही. त्यामुळे सद्यस्थितीत स्त्री रुग्णालय शनिवार बाजार भागात असलेल्या नेत्र रुग्ण वॉर्ड येथे स्थलांतरित करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.जावेद अथर यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
परभणी : स्त्री रुग्ण विभाग १२ वर्षांपासून गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:30 AM