लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील एमआयडीसी भागातील कोरोना बाधित युवकाच्या घराच्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेतील १०० हून अधिक अधिकारी- कर्मचारी दोन दिवसांपासून जिवाची पर्वा न करता काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळेच शहरातील इतर भाग आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.पुण्याहून आलेला एक युवक गुरुवारी सकाळी कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शहरातील एमआयडीसी भागात महानगरपालिका, पोलीस प्रशासनाने उपाययोजनांना सुरुवात केली. हा युवक ज्या नातेवाईकाच्या घरी आला होता. ते घर केंद्रस्थानी मानून ३ कि.मी. परिसर सील करण्यात आला आहे. त्यानंतर या भागातून कोरोनाचा प्रसार इतर भागात होऊ नये, इतर नागरिकांनाही संसर्ग होऊ नये, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने तत्पर भूमिका घेत या संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केली. शुक्रवारी दुपारी आणि सायंकाळी सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी केली. त्यानंतर दररोज दोन वेळा ही फवारणी करण्याचे काम अग्निशमनचे अधिकारी- कर्मचारी करीत आहेत. हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. या भागातून कोणालाही बाहेर पडता येत नाही किंवा येथे येण्यासही प्रतिबंध केला आहे. अशा परिस्थितीमध्ये स्वत:चा जीव धोक्यात घालून महानगरपालिकेचे १०० अधिकारी- कर्मचारी या ठिकाणी काम करीत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, सुपरवायझर, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, अग्नीशमन विभागाचे कर्मचारी आदींचा समावेश आहे. या भागातील ४ हजार घरांचे सर्वेक्षण कर्मचाऱ्यांनी सुरु केले आहे. त्यात प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन घरात कोणी आजारी आहे का?, ताप, खोकला या सारखा संसर्ग होतो का, याची विचारपूस करुन त्या त्या नागरिकाला आरोग्य सेवा पुरविण्याचे कामही सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी एकूण २३ पथके कार्यरत करण्यात आली आहेत. अस्वच्छतेमुळे रोगाचा फैलाव वाढू नये, या उद्देशाने स्वच्छता कर्मचारी दररोज या भागात नियमित स्वच्छता करीत आहेत. त्यामुळे एकीकडे कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्याचे बंधन घालण्यात आले आहे. तर दुसरीकडे मनपाचे हे कर्मचारी प्रत्यक्ष कोरोना बाधित युवक आढळल्या स्थळी जावून उपाययोजना करीत आहेत. त्यांच्या या उपाययोजनांमुळेच शहरातील इतर नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.अत्यावश्यक सेवेचेही नियोजनकन्टेटमेंट क्षेत्र जाहीर झालेल्या भागातील नागरिकांना घराबाहेर आणि या सीलबंद भागातून बाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. अशा वेळी येथील नागरिकांना काही अत्यावश्यक सेवा पुरवायच्या असतील तर त्यासाठीही मनपाने उपाययोजना केली आहे. ही जबाबदारी वसुली लिपिकांना देण्यात आली असून त्यांचे मोबाईल क्रमांकही जाहीर करण्यात आले आहे. या मोबाईलवर नागरिकांनी फोन केल्यानंतर त्यांना जागेवर अत्यावश्यक असलेले साहित्य उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
परभणी : जिवाची पर्वा न करता कोरोनाशी लढा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 12:02 AM