लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी ) : येथील वनविभागाच्या रोपवाटिकेला १० नोव्हेंबर रोजी लागलेल्या आगीत सर्वच्या सर्व झाडे जळून खाक झाली आहेत.१० नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास या रोपवाटिकेला आग लागली. आगीचे लोट एवढे प्रचंड होते की, रोपवाटिकेतील सर्व झाडे जळून खाक झाली. येथील सरपंचांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोन लावून माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकारी उपलब्ध झाले नाहीत. अग्नीशमनदलाच्या गाडीलाही पाचारण करण्याचे प्रयत्न झाले. मात्र गतवर्षी याच रोपवाटिकेत लागलेली आग विझविण्यासाठीचे देयके वनविभागाने दिली नसल्याने कोणाच्या सांगण्यावरुन गाडी आणायची, असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर जिंतूर येथील तहसीलदारांनी अग्नीशमनदलाची गाडी पाठविली. मात्र तोपर्यंत सर्व झाडे जळून खाक झाली होती.येलदरी येथे २०१६-१७ साली पर्यटन मोहिमेअंतर्गत तत्कालीन जिल्हाधिकारी एस.पी.सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पाटबंधारे विभागाच्या अतिरिक्त जागेवर साडेतीन एकर क्षेत्रावर रोपवाटिका उभारली होती.या रोपवाटिकेत सुमारे ३ हजारहून अधिक झाडे लावली होती. शनिवारी आग लागल्याचे निदर्शनास आले. सरपंच प्रमोद चव्हाण यांनी वनविभागाच्या अधिकाºयांना फोन लावण्याचा प्रयत्न केला; परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आग वेळेत विझली नाही. आगीचे लोट वाढत असल्याने परिसरात राहणाºया नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. वसाहतीच्या सुरक्षेतेसाठी कर्तव्यावर असलेले सुरक्षारक्षक राठोड यांच्यासह आर.एल. भंडारी, प्रमोद चव्हाण, प्रवीण मुळी, माकोडे, शिराळे, शेख आमेर यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण मात्र समजू शकले नाही.