लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : आंब्याच्या गोदामाला आग लागून साडे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना गंगाखेड शहरातील देवळे जिनिंग परिसरात गुरुवारी रात्री घडली.शहरातील फळ विक्रेते सय्यद जैनू सय्यद युसूफ, शेख मुस्तफा शेख बाबा, सय्यद गणी सय्यद हसन यांनी आंध्रप्रदेशातून निलम, लालबाग, बदाम, केसर जातीचे १७ टन आंबे मागविले होते. आलेला आंब्याचा ट्रक शहरातील देवळे जिनिंग परिसरात असलेल्या गोदामामध्ये २४ एप्रिल रोजी उतरविला होता. आंबा उतरविल्यानंतर फळ विक्रेते घरी गेले होते. गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास अचानक गोदामाला आग लागली. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर फळ विक्रेते व नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्नीशमनदलाला पाचारण करुन आग विझविली. तोपर्यंत गोदामामधील साहित्य जळून खाक झाले होते. आगीत साडेतीन लाख रुपयांच्या आंब्याचे नुकसान झाले. या प्रकरणी सय्यद जैनू सय्यद युसूफ यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
परभणी : आंब्याच्या गोदामाला गंगाखेडमध्ये आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:33 AM