लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : उच्चदाब वितरण प्रणाली योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली असून, गुरुवारी या योजनेंतर्गत कौडगाव येथे महिला शेतकऱ्याच्या कृषीपंपासाठी स्वतंत्र विद्युत रोहित्र सुरू करण्यात आले.जिल्ह्यातील अनेक शेतकºयांनी कृषीपंपासाठी वीज जोडणीचे अर्ज केले आहेत़ सुमारे ३ हजार ९६३ कृषीपंप धारकांनी ५ ते ६ हजार रुपयांचे कोटेशन भरले़; परंतु, त्यांना वीज जोडणी मिळाली नाही़ वीज जोडणीसाठी असलेले साहित्यही शेतकºयांना मिळाले नसल्याने कृषीपंपाचा वीजपुरवठा रखडला होता़ जिल्ह्यामध्ये अनेक शेतकºयांना वीज जोडणीची मागणी केल्यानंतर १० ते १५ हजार रुपये खर्च करून त्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करावे लागत होते़ शासनाने काही दिवसांपूर्वी उच्चदाब वितरण प्रणाली सुरू केली आहे़ यासाठी जिल्ह्याला ८८ कोटी १८ लाख रुपये प्राप्त झाले आहेत़ या निधीतून अर्ज केलेल्या सुमारे ४ हजार शेतकºयांना लाभ दिला जाणार आहे़ या अंतर्गत अर्ज केलेल्या शेतकºयांना स्वतंत्र विद्युत रोहित्र बसविले जाणार आहेत़ तसेच यासाठी लागणारे वीज साहित्य महावितरणच्या वतीने दिले जाणार आहे़ त्यामुळे शेतकºयांना स्वत:च्या कृषीपंपासाठी स्वतंत्र विद्युत रोहित्रही उपलब्ध होणार आहे़ राज्यात ही योजना सुरू केली असली तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाली नाही़ दोन दिवसांपूर्वी या योजनेअंतर्गत ताालुक्यातील कौडगाव येथे लाभार्थी शेतकरी वंदना गजानन लोंढे यांच्या शेतातील कृषीपंपासाठी स्वतंत्र विद्युत रोहित्र उभारण्यात आला़ वीज चोरी रोखण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे़ येथील अभियंता आऱडी़ मगर यांनी योजना कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा करून प्रत्यक्षात अंमलबजावणीही केली़ या प्रसंगी महावितरणचे मुंबई येथील विशेष अधिकारी रणदिवे, कार्यकारी अभियंता लोंढे, मोरे, उपकार्यकारी अभियंता भागवत, सहायक अभियंता पकवने, नितनवरे, दुधे, योगेश मुळी, आऱडी़ जाधव़ आदींची उपस्थिती होती़मराठवाडा विभागातील पहिली लाभार्थीया योजने अंतर्गत मराठवाड्यात अद्यापही विद्युत रोहित्र उभारण्यास सुरुवात झाली नाही़ परभणीतील कौडगाव येथील वंदना लोंढे यांच्या कृषीपंपाला योजनेतून वीज पुरवठा मिळाल्याने मराठवाडा विभागातील त्या पहिल्या लाभार्थी महिला ठरल्या आहेत़
परभणी : कृषीपंपासाठी उभारले पहिले स्वतंत्र रोहित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:59 AM