लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने २ ते ४ जानेवारी या काळात जालना येथे आयोजित केलेल्या अखिल भारतीय स्तरावरील पशु-पक्षी प्रदर्शनामध्ये परभणी जिल्ह्यातील तीन पशुपालकांच्या पशुधनाला १ लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे़ तसेच दोन पशुधनांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले़जालना येथे नुकतेच महापशूधन एक्सपो हे राष्ट्रीयस्तरावरील पशू-पक्षी प्रदर्शन पार पडले़ या प्रदर्शनामध्ये पालम तालुक्यातील जोगलगाव येथील दत्तराव तुकाराम डुमनर यांच्या संकरित गायीला होस्टन फ्रिजीयन प्रकारात १ लाख रुपयांचे पहिले बक्षीस मिळाले़ त्याच प्रमाणे आ़ बाबाजानी दुर्राणी यांच्या जाफ्राबादी रेड्याला १ लाख रुपयांचे आणि परभणी येथील विनायक नामदेव लुबाळे यांच्या जाफ्राबादी म्हशीला १ लाख रुपयांचे प्रथम बक्षीस मिळाले आहे़त्याच प्रमाणे देवणी वळू या गटात गंगाखेड तालुक्यातील गुंजेगाव येथील गोविंद विश्वनाथ इमडे यांच्या वळुला ७५ हजार रुपयांचे द्वितीय आणि सोनपेठ तालुक्यातील सायखेडा येथील मुरारी उद्धव चव्हाण यांच्या लालकंधारी वळूला ५० हजार रुपयांचे तृतीय बक्षीस मिळाले आहे़विशेष म्हणजे जिल्ह्यातून ५० पशूधनांसह १२ अश्वांनीही सहभाग नोंदविला होता़ पशुपालकांना या प्रदर्शनात सहभागी करून घेण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ़ एस़बी़ खोडवे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ ए़बी़ लोणे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ़ आऱए़ कल्यापुरे, डॉ़ एऩएल़ धोंड यांनी मार्गदर्शन केले़
परभणी : पशुप्रदर्शनात परभणीला पाच पारितोषिके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 12:56 AM