लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी आहे. त्यामुळे परभणीकरांची जिव्हाळ्याची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी पूर्ण झाली आहे.परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी करावी, अशी मागणी जिल्हाभरातून केली जात होती. त्यासाठी खा. बंडू जाधव यांनी पुढाकार घेत आंदोलन केले. या आंदोलनाला सर्वपक्षीय आंदोलनाचे स्वरुप प्राप्त झाले होते. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थी, महिला, वकील मंडळी, डॉक्टर्स, प्राध्यापक अशा सर्वस्तरातील नागरिकांनी या आंदोलनात सहभाग नोंदवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी रेटून धरली होती. खा. बंडू जाधव यांनी शासकीय मेडिकल कॉलेजसाठी शासन दरबारी पाठपुरावा केला. त्याचप्रमाणे आ.डॉ.राहुल पाटील यांनीही आरोग्यमंत्री गिरीष महाजन यांची भेट घेऊन मेडिकल कॉलेजचा प्रश्न लावून धरला होता. माजी आ.विजय गव्हाणे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी ही मागणी रेटून धरली. शनिवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी परभणी येथील जिल्हा रुग्णालयाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे परभणीकरांचा वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी पूर्ण झाली आहे. तसेच जिल्ह्यातून उभारलेल्या जन आंदोलनाला यश मिळाले आहे.
परभणी : वैद्यकीय महाविद्यालयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 11:42 PM