लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : कापसाच्या बोंडअळीच्या सर्वेक्षणात बाधित क्षेत्र कमी दाखविल्याच्या कारणावरून तालुक्यातील तुरा येथील एका शेतकऱ्याने प्रशासनाच्या दिरंगाईला कंटाळून तहसीलदारांसमोरच तहसीलच्या आवारात विषाचा डबा उघडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ३१ मार्च रोजी दुपारी ही घटना घडली. यावेळी उपजिल्हाधिकारीही उपस्थित होते. दरम्यान, पोलिसांनी या शेतकºयावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.बोंडअळीच्या प्रादुर्भावाने तालुक्यात कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. तलाठी, ग्रामसेवक आणि कृषीसहाय्यकांच्या पथकाने पंचनामे करून शासनाला अहवालही सादर केला होता. पाथरी तालुक्यातील तुरा येथील विष्णू भीमराव शिंदे (वय २८) यांच्या शेतातील एक हेक्टर ४० आर क्षेत्रावरील कापूस बाधित झाला होता. मात्र पंचनामे करताना केवळ ५२ आर क्षेत्र बाधित दाखविण्यात आले. त्यामुळे या शेतकºयाने दोन महिन्यांपूर्वी पाथरीच्या तहसीलदारांकडे लेखी अर्ज दिला होता. सर्व बाधित क्षेत्राचा समावेश पंचनाम्यामध्ये करावा, अशी मागणी केली होती. तहसीलदारांनी तलाठ्यांना बोलावून योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र कारवाई झाली नाही. सतत पाठपुरावा करूनही उपयोग होत नसल्याने विष्णू शिंदे हे वैतागले होते.त्यातच ३१ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास विष्णू शिंदे तहसील कार्यालयात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी सी.एस. कोकणी यांच्या उपस्थितीत बैठक सुरू होती. तहसीलदार वासुदेव शिंदे व महसूलचे इतर कर्मचारीही उपस्थित होते. ही बैठक सुरू असताना विष्णू शिंदे हे खिशात औषधाचा डब्बा घेऊन बाहेर उभे राहिले. यावेळी सरपंच मदन तोडगे व इतर दहा शेतकरी सोबत होते. बैठक संपताच विष्णू शिंदे आणि इततर शेतकरी अचानक तहसीलमध्ये घुसले. विष्णू शिंदे यांच्या बोंडअळीच्या पंचनाम्या संदर्भात दोन महिन्यांपासून कारवाई झाली नाही. तलाठी आरेरावी करीत आहेत, अशी तक्रार करीत शिंदे यांनी विषाच्या डब्याचे झाकण उघडताच महसूल विभागाच्या कर्मचाºयांनी शिंदे यांना पकडले. यामुळे तहसील कार्यालयात एकच धावपळ उडाली. पोलिसांनीही घटनास्थळी दाखल होऊन सदर शेतकºयास ताब्यात घेतले. या प्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक व्ही.व्ही. श्रीमनवार यांनी दिली.
परभणी : तहसीलदारांसमोरच उघडला विषाचा डबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 12:38 AM