लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर नवीन वस्तुंची खरेदी करण्यासाठी दोन दिवसांपासून ग्राहक बाजारपेठेत दाखल होत आहेत. शुक्रवारी सराफा, इलेक्ट्रॉनिक्स बाजारात ग्राहकांची गजबज पहावयास मिळाली.चैत्र प्रतिपदेपासून मराठी नवीन वर्षाला प्रारंभ होतो. वर्षभरातील साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असल्याने या दिवशी नवीन वस्तू घरात आणण्याची प्रथा रुढ आहे. जिल्ह्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने बाजारपेठेत मंदीचे वातावरण आहे. सहा महिन्यांपासून आर्थिक उलाढाल ठप्प झाल्याची परिस्थिती असून दोन दिवसांपासून या बाजारपेठेत गुढी पाडव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा उठाव आला आहे. शहरातील सराफा बाजारपेठ, इलेक्ट्रॉनिक्स, दुचाकी वाहन विक्रेत्यांबरोबर भुसार बाजारपेठेतही ग्राहकांची लगबग पहावयास मिळत आहे. पाडव्याच्या निमित्ताने व्यापाऱ्यांनीही वस्तुंच्या खरेदीवर सवलती जाहीर केल्या आहेत. या सवलतींचा लाभ उठविण्यासाठी ग्राहक बाजारपेठेत दाखल होत आहेत. शनिवारी गुढी पाडव्याचा सण साजरा केला जात असून या सणाच्या दिवशी फ्रीज, कुलर, टीव्ही, दुचाकी आणि चारचाकी वाहनांची बुकिंग शुक्रवारी अनेकांनी करुन ठेवली आहे. तर सराफा बाजारपेठेमध्ये सोने खरेदी करण्यासाठीही दोन दिवसांपासून ग्राहकांची संख्या वाढली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.गुढी पाडव्याच्या दिवशी सोने खरेदी केले जाते. त्यामुळे शुक्रवारी या बाजारपेठेतही ग्राहक सोन्याचा भाव जाणून घेत होते. अनेकांनी अॅडव्हान्स रक्कम देऊन दागिण्यांची बुकिंग केल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले.ग्रामीण भागात सालगड्यांचाही ठरणार भाव४कृषी क्षेत्रात गुढी पाडव्याला महत्व आहे. पाडव्यापासून शेतातील सालगड्यांचा हिशोब निश्चित केला जातो. त्यामुळे नवीन वर्षात सालगड्यांचा भाव ठरविला जातो. शुक्रवारी हे भाव ठरविण्यासाठी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बैठका झाल्या.
परभणी : ग्राहकांनी गजबजली बाजारपेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 11:59 PM