लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : येथील नगरपालिका कार्यालयातील नगररचना सहाय्यक कर्मचाºयास नगरसेवकाने मारहाण केल्याची घटना २१ मे रोजी दुपारी घडली़ या घटनेच्या निषेधार्थ २२ मे रोजी ऩप़ कर्मचाऱ्यांनी दिवसभर काम बंद ठेवून नगरसेवकावर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी करीत धरणे आंदोलन केले़गंगाखेड नगरपालिका कार्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी व नगरसेवकांमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणावरून नेहमीच कुरबुरी होत असल्याची बाब आता नित्याचीच झाल्याचे येथे घडलेल्या घटनांवरून समोर येत आहे़ यातूनच काही दिवसांपूर्वी सर्वच नगरसेवकांनी मुख्याधिकारी नानासाहेब कामटे यांच्याविरूद्ध जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अविश्वास ठराव दाखल केला होता़ तर बांधकामावर अभियंत्यास पाठविल्याच्या कारणावरून ८ मे रोजी काही जणांनी नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांना त्यांच्या खाजगी कार्यालयात जाऊन मारहाण केल्याची घटना घडली होती़ ही घटना झाली असतानाच २१ मे रोजी नाव परिवर्तन विभागात दाखल करण्यात आलेल्या बाबूराव रंगनाथराव गायकवाड यांच्या संचिकेवर नगररचना विभागाचा अहवाल मागण्यासाठी नगरसेवक विशाल साळवे यांनी नगररचना विभागात येऊन अहवाल का देत नाही, असे म्हणून रचना सहायक कर्मचारी गणेश भोकरे यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर संचिकेची तपासणी करू दिली नाही, अशी तक्रार गणेश भोकरे यांनी जिल्हा प्रशासन अधिकारी तथा नगरपालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी अलका खैरे यांच्याकडे दिली़ त्यानंतर उपमुख्याधिकारी स्वाती वाकोडे यांनी सदरील घटनेचा पंचनामा मुख्याधिकाºयांकडे सादर केला. त्यावरून प्रभारी मुख्याधिकारी अलका खैरे यांनी २२ मे रोजी नगरसेवक विशाल साळवे यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची शिफारस जिल्हाधिकाºयांकडे केली आहे़या घटनेच्या निषेधार्थ नगरपालिका कर्मचाºयांच्या वतीने २२ मे रोजी दिवसभर काम बंद करून धरणे आंदोलन केले़ या आंदोलनात स्वाती वाकोडे, भगवान बोडखे, व्ही़टी़ लहाने, सय्यद जुबरे, मयुरी पाटील, व्हीक़े़ तातोडे, रत्नप्रभा सुग्रे, शेख गफार, महावीर नवले, गणेश भोकरे, पी़एऩस्वामी, रमेश मणियार, मुकुंद कोकड, अमोल जगतकर, राजू गेचड, सुनीता गिराम, शिवशंकर वाघमारे, अंजना बीडगर आदींनी सहभाग नोंदविला.
परभणी : गंगाखेड नगरपालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:31 PM