परभणी : दहशतवाद मुक्तीसाठी वंचितांना सत्ता द्या- बाळासाहेब आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:51 AM2019-02-17T00:51:22+5:302019-02-17T00:51:48+5:30
देशात सत्ता बदल झाली तरीही जवानांचा बळी जात आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सेना, भाजपा हे पक्ष एकाच माळेचे मणी आहेत. तेव्हा देश दहशतवाद मुक्त करायचा असेल तर वंचितांना सत्ता द्या, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : देशात सत्ता बदल झाली तरीही जवानांचा बळी जात आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सेना, भाजपा हे पक्ष एकाच माळेचे मणी आहेत. तेव्हा देश दहशतवाद मुक्त करायचा असेल तर वंचितांना सत्ता द्या, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.
येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर १६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्ता संपादन महासभेचे आयोजन केले होते. या सभेत अॅड.आंबेडकर बोलत होते. अध्यक्षस्थानी मारोतराव पिसाळ हे होते. तर व्यासपीठावर उपराकार लक्ष्मणराव माने, अमित भुईगळ, कॉ.गणपत भिसे, दादाराव पंडित, डॉ.धर्मराज चव्हाण, इम्तियाज खान, प्रा.डॉ.प्रवीण कनकुटे, वंदना जोंधळे, अण्णाराव पाटील आदींची उपस्थिती होती.
अॅड.आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्रात लोकशाही उरली नसून घराणेशाहीचा उदय झाला आहे. महाराष्ट्रातील सत्ता केवळ १६९ कुटुंबियांकडे उरली आहे. २०१४ मध्ये आम्ही सर्वांपेक्षा वेगळे आहोत, असे म्हणत सत्ता संपादन केलेल्या भाजपाच्या काळात सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यातील हल्लेखोरांना तात्काळ पकडावे, आर्थिक कोंडीत सापडलेल्या पाकिस्तानला नियंत्रणात आणू शकत नसताल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा, गुप्तचर यंत्रणेने दिलेली माहिती दडवून ठेवणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आम्हाला चार जागा देऊ, असे सांगितले जाते.
अकोल्यामध्ये झालेल्या कॉंग्रेसच्या अभिवादन सोहळ्यात संभाजी भिडे यांना आमंत्रित करण्यात आले. भिडेंना बोलविणाºया कॉंग्रेस पदाधिकाºयांवर कारवाई केली नाही तर तुम्ही सेक्यूलर कसे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटनाचे कार्यक्रम बाजूला सारुन दहशतवाद्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करुन देशाला दहशतवाद मुक्त करायचे असेल तर मुस्लिम, धनगर, बौद्ध, मातंग, चांभार, सोनार, कैकाडी, वडार, लिंगायत, नाभिक यासह वंचित घटकांनी एकत्र येऊन वंचितांना सत्ता द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
या सभेत लक्ष्मणराव माने, इम्तियाज खान, धर्मराज चव्हाण, कॉ.गणपत भिसे यांनी मार्गदर्शन केले. मारोतराव पिसाळ यांनी अध्यक्षीय समारोप केला.
सभेस जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, महिला भारिप, जिल्हा युवक भारिप, सम्यक विद्यार्थी आंदोलन, लालसेना आदी संघटनेतील पदाधिकाºयांनी प्रयत्न केले.