लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकचे साहित्य बाजारपेठेत सहज उपलब्ध होत असून, उलट बंदीनंतर साहित्याची विक्री बंदीच्या नावावर चढ्या दराने होत आहे़ प्रशासनाच्या प्लास्टिक मुक्तीचा निर्णय शहरामध्ये सध्या तरी फुसका बार ठरल्याचे दिसून येत आहे़महाराष्ट्र शासनाने वर्षभरापूर्वी प्लास्टिकच्या वस्तुवर बंदी घातली होती़ कॅरीबॅग, पाणी पाऊच, प्लास्टिक ग्लास, द्रोण तसेच इतर प्लास्टिक वस्तू वापरू नयेत, असे आदेश असतानाही या वस्तुंची जिंतूर शहरासह तालुक्यात सर्रास विक्री होत असताना बाजारपेठेत दिसून येत आहे़ प्लास्टिक बंदीची घोषणा झाल्यानंतर बाजारपेठेत खळबळ उडाली होती़ प्रशासनाने तीन महिन्यांची सलवत दिली़ मात्र बंदीचा फारसा परिणाम जाणवला नाही़ ५१ मायक्रॉनपेक्षा कमी मॉयक्रॉनचे प्लास्टिक वापरावे, असे आदेश असतानाही या आदेशाचे खुलेआम उल्लंघन होत आहे़ बाजारपेठेतील ७५ टक्के व्यापारी आजही ग्राहकांना कॅरीबॅग उपलब्ध करून देत आहेत़विशेष म्हणजे ग्राहकसुद्धा कॅरीबॅगशिवाय माल घेण्यास तयार नाहीत़ परिणामी बंदीची पर्वा न करता व्यापारी ग्राहकांना कॅरीबॅग उपलब्ध करून देत आहेत़ शिवाय प्लास्टिक ग्लास, द्रोण, पाणी पाऊच व इतर साहित्यांना वापरावयाचे प्लास्टिक सहजपणे उपलब्ध होत असल्याने प्लास्टिक बंदी नसल्याचेच चित्र जिंतूर शहरात दिसून येत आहे़ रस्त्याच्या दुतर्फा पडलेले प्लास्टिकचे साहित्य, कॅरीबॅग, प्लास्टिक ग्लास हे बंदी नसल्याचेच द्योतक आहे़ एकीकडे पर्यावरण वाचवा म्हणणारे कॅरीबॅग व प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत असताना म्हणावा तसा प्रतिसाद व्यापारी, प्रशासन व नागरिकांकडून मिळत नाही, नव्हे तर त्यांची मानसिकताही नसल्याचे दिसून येते़ परिणामी शासनाचा कितीही चांगला निर्णय असला तरी लोकजागृती व प्रशासनाचा उदासिनपणा यामुळे हा निर्णय कागदावरच राहत आहे़रात्रीच्या वेळी होते वाहतूकप्लास्टिक बंदीचा कोणताही धाक न ठेवता कॅरीबॅग, प्लास्टिक ग्लासची रात्रीच्या वेळी वाहनातून सहजपणे वाहतूक केली जाते़ विशेष म्हणजे जालना व नांदेड येथून सर्वाधिक माल शहरात दाखल होतो़ प्लास्टिक बंदीच्या नावावर मोठी भाववाढही झाल्याचे बोलले जात आहे़पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिकचा वापर बंद होणे गरजेचे आहे़ प्लास्टिकमुळे कॅन्सरसारख्या आजाराचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे़ प्रशासनाने कठोर पावले उचलून कार्यवाही केली तर त्याचा परिणाम होवू शकतो़ शिवाय जनजागृती होणेही गरजेचे आहे़-अॅड़ मनोज सारडा, पर्यावरणप्रेमी
परभणी : जिंतूरमध्ये प्लास्टिक बंदीला प्रशासनाचा खो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:05 AM