लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील गोंधळ सातत्याने चव्हाट्यावर येत असून आता चक्क माध्यमिकच्या शिक्षकांना थेट गंगाखेडच्या गटशिक्षणाधिकाºयांचा पदभार देण्याची किमया या विभागाच्या अधिकाºयांनी नियम डावलून साधली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचा कारभार पुन्हा एकदा नकारात्मक दृष्टीकोनातून चर्चेला आला आहे.जि. प. च्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी आशा गरुड यांच्या कारभारावर सातत्याने टीका होत आहे. जि.प.च्या शिक्षण समितीच्या बैठकीतून काही दिवसांपूर्वीच उपस्थित सदस्यांनी गरुड यांना बाहेर जाण्यास सांगितले होते. तत्पूर्वी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही गरुड यांच्या कारभारावर सदस्यांनी टीका केली होती. आता पुन्हा एकदा गरुड यांचा शिक्षण विभाग नकारात्मक दृष्टीकोनातून चर्चेचा विषय बनला आहे. निमित्त ठरले आहे ते, गटशिक्षणाधिकाºयांच्या पदभाराचे. गंगाखेडचे गटशिक्षणाधिकारी कदम हे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांचा पदभार पालमचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी तथा ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पारवेकर यांच्याकडे देण्यात आला. पारवेकर हे ३१ डिसेंबर रोजी अर्जित रजेवर गेले. त्यामुळे पारवेकर यांचा गंगाखेडचा पदभार, गंगाखेड येथीलच ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी सगट यांना देणे अपेक्षित असताना राणीसावरगाव येथील जि.प. शाळेतील माध्यमिक शिक्षक रावसाहेब कातकडे यांना दिला गेला. कातकडे यांना पदभार देण्यासंदर्भात काढण्यात आलेल्या आदेशातच पालमचा पदभार सगट यांना देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सगट यांना गंगाखेडचा पदभार मिळणे अपेक्षित असतानाही कातकडे यांनाच पदभार देण्याची मेहरबानी वरिष्ठांनी दाखविली. विशेष म्हणजे परभणी येथेही ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी निलपत्रेवार हे मुख्यालयी असतानाही त्यांना गंगाखेडचा पदभार दिला गेला नाही. शिवाय गंगाखेड पंचायत समितीने सगट यांनाच पदभार देण्याची शिफारस केली असतानाही कातकडे यांनाच वरिष्ठांनी प्राधान्य दिले. त्यामुळे माध्यमिक शिक्षक कातकडे यांना पदभार देण्यासाठी कोण खटाटोप केली व माध्यमिक शिक्षकास गटशिक्षणाधिकाºयांचा पदभार देता येतो का? असाही सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.रुजू होण्यास आलेल्या पारवेकरांना परत पाठविलेअर्जित रजेवरुन पालमचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी पारवेकर हे रुजू होण्यासाठी सोमवारी परभणीत आले होते. परंतु, त्यांना रुजू करुन घेतले गेले नाही. तुमच्यामुळे गंगाखेडचा पदभार देण्यावरुन बराच त्रास झाला, आता आणखी एक-दीड महिना अर्जित रजा घ्या, अशी पडद्यामागे सूचना देऊन त्यांना रुजू करुन घेण्यात आले नाही, असे समजते. या संदर्भात प्रतिक्रियेसाठी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे यांच्याशी संपर्क साधला असता ते बैठकीत असल्याने त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. शिक्षणाधिकारी आशा गरुड यांचा मोबाईल बंद असल्याने त्यांचीही भूमिका या विषयी कळू शकली नाही.पाच तालुक्यांना प्रभारी गटशिक्षणाधिकारीजिल्ह्यातील पाच तालुक्यात गटशिक्षणाधिकाºयांच्या जागा रिक्त आहेत. या पाचही ठिकाणी शिक्षण विस्तार अधिकाºयांना पदभार देण्यात आला आहे. त्यामध्ये परभणीचा पदभार राजूरकर यांच्याकडे तर सेलूचा पदभार जयंत गाडे यांच्याकडे देण्यात आला आहे. सोनपेठचा पदभार पठाण यांच्याकडे तर पालमचा पदभार सगट यांच्याकडे देण्यात आला आहे. आता गंगाखेडचाही पदभार माध्यमिक शिक्षक रावसाहेब कातकडे यांच्याकडे देण्यात आला आहे. याशिवाय जि.प.तील उपशिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांची लातूरला बदली झाल्यानंतर त्यांची जागा रिक्त असून त्यांचा पदभार पूर्णेचे गटशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांच्याकडे देण्यात आला आहे. जिल्ह्यातील चार पंचायत समित्यांमध्ये कायमस्वरुपी गटशिक्षणाधिकारी आहेत. त्यामध्ये जिंतूरमध्ये रणखांब, मानवत येथे ससाणे, पाथरी येथे खोगरे तर पूर्णा येथे भुसारे यांची या पदावर कायमस्वरुपी नियुक्ती आहे.
परभणी : माध्यमिक शिक्षकास दिला गटशिक्षणाधिकाºयांचा पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 12:30 AM