लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : एक वर्षांपासून थकलेले मानधन आणि प्रवास भत्ता अदा करावा या मागणीसाठी जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.परभणी जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांचे मानधन मागील एक वर्षापासून थकले आहे तसेच प्रवास भत्ताही मिळाला नसल्याने ग्रामरोजगार सेवकांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.या प्रश्नी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेने ३ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मानधन अदा करावे, अशी मागणी केली होती. मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे ७ जून रोजी ग्रामरोजगार सेवकांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी दहा वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून मानधनाची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. ग्रामरोजगार सेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामराव देशमुख यांच्यासह आर.बी. बोबडे, शिंदे, ढोणे, सोनवणे, जाधव, मारुती पारवे, प्रमोद पारखे, दिलीप शिराळे, आर.एन. गाडे आदींसह ग्रामरोजगार सेवक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
परभणी : थकित मानधनासाठी ग्रामरोजगार सेवकांनी केले धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 12:17 AM