लोकमत न्यूज नेटवर्कदैठणा (परभणी): धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परभणी तालुक्यातील दैठणा येथील संत दत्ताबुवा यांच्या समाधीचे पंधरा हजार भाविकांनी बुधवारी दर्शन घेतले. त्यामुळे मंदिर परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला.परभणी ते गंगाखेड रस्त्यावरील इंद्रायणी नदीकाठावर दैठणा हे गाव आहे. या ठिकाणी थोर संत दत्ताबुवा यांची समाधी आहे. त्यामुळे या गावाला धाकटे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाते. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठोबाचे दर्शन घेण्यासाठी जाणारे भाविक दैठणा येथील दर्शन घेऊन मार्गक्रम करतात. त्याच बरोबर पंढरपूर येथून परतवारीसाठी निघालेले भाविक दैठणा येथे दर्शन घेण्यास येण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे.बुधवारी कामिका भागवत एकादशीनिमित्त पहाटे पाच वाजल्यापासून मंदिर परिसरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. त्याच बरोबर महातपुरी, सुनेगाव, सायाळा, पोंहडूळ, धारासूर, साळापुरी, आंबेटाकळी, खळी, पेगरगव्हाण, ताडपांगरी, दुस्सलगाव, मुळी, रुमणा आदी २५ गावांतील वारकरी पायदळी दिंड्या घेऊन टाळ, मृदंगासह हरिनामाच्या गजरात धाकट्या पंढरीत दाखल झाले होते. बुधवारी पंधरा हजार भाविकांनी थोर संत दत्ताबुवा यांच्या समाधीचे दर्शन घेतले. ग्रामस्थांच्या वतीने भाविकांची चहा, पाण्याची सोय करण्यात आली होती. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
परभणी : हरिनामाच्या गजराने धाकटी पंढरी दुमदमली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 12:53 AM