- अभिमन्यू कांबळे परभणी : शिवसेनेच्या तिकिटावर जे निवडून आले त्यापैकी ज्यांनी सेना सोडली त्यांना जनतेनेच सोडून दिल्याचा आजवर जिल्ह्याचा इतिहास आहे. त्यामुळेच ‘परभणीकरांची रीतच न्यारी’ अशी म्हण राजकीय वर्तुळात चर्चेत येत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार धोक्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात ५ वेळा शिवसेनेत फूट पडली आहे. असे असताना परभणीतही शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या नेत्यांना नंतर मात्र राजकारणात यश मिळाले नसल्याचा इतिहास पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.
अन् शिवसेनेला राज्यस्तरावर मान्यता १९८९ मध्ये शिवसेनेला पक्षाची मान्यता नसताना सेनेचे अशोकराव देशमुख हे अपक्ष म्हणून पहिल्यांदा परभणी लोकसभेतून निवडून आले होते. त्यानंतर शिवसेनेला राज्यस्तरावर पक्षाची मान्यता मिळाली. त्यामुळे १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत अशोकराव देशमुख हे शिवसेनेकडून पुन्हा एकदा लोकसभेवर निवडून आले. १९९६ मध्ये शिवसेना सोडून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि या वर्षीच्या निवडणुकीत त्यांचा शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश जाधव यांनी पराभव केला.
१९९८ च्या लोकसभा निवडणुकीत १८ महिने चाललेल्या सरकारच्या वेळी काँग्रेसचे सुरेश वरपूडकर विजयी झाले. हा शिवसेनेच्या स्थापनेनंतर झालेल्या निवडणुकीचा एकमेव अपवाद. त्यावेळी शिवसेनेचे सुरेश जाधव पराभूत झाले. १९९९ मध्ये पुन्हा सेनेकडून जाधव निवडून आले. त्यांनी काँग्रेसच्या रावसाहेब जामकर यांचा पराभव केला. नंतरच्या कालावधीत जाधव यांनी शिवसेना सोडली.
२००४ च्या निवडणुकीत ॲड. तुकाराम रेंगे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली. त्यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश वरपूडकर यांचा पराभव केला. नंतर त्यांनी शिवसेना सोडली आणि २००९ मध्ये काँग्रेसकडून परभणी विधानसभा लढविली. त्यात त्यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे तत्पूर्वी १९९५ व १९९९ असे दोन वेळा ॲड. रेंगे पाटील शिवसेनेच्या तिकिटावर परभणी विधानसभेतून निवडून आले होते.
तसेच १९९० मध्ये हनुमंतराव बोबडे परभणी विधानसभेतून शिवसेनेच्या तिकीटावर विजयी झाले होते. नंतर त्यांनी शिवसेना सोडली. ते पुन्हा लोकनियुक्त प्रतिनिधी होऊ शकले नाहीत.