लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : संचारबंदीमुळे शहरातील सर्व वाहतूक ठप्प असल्याने व रुग्णवाहिकाही उपलब्ध झाली नसल्याने प्रसुती वेदनेने विव्हळत सायकल रिक्षामध्ये जिल्हा रुग्णालयाकडे जाणाºया एका महिलेला महानगरपालिका व पोलीस कर्मचाऱ्यांनी माणुसकी दाखवत तातडीने वाहनाद्वारे दवाखान्यात दाखल केल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात घडला.परभणी शहरातील वर्षा नागेश आठवले या २१ वर्षीय विवाहितेला शुक्रवारी सकाळी प्रसुती वेदना सुरु झाल्या. त्यामुळे त्यांनी नातेवाईकांसह जिल्हा रुग्णालय गाठण्याचा निर्णय घेतला; परंतु, संचारबंदीमुळे सर्व वाहने बंद आहेत. रुग्णवाहिकेला फोन करुन ती बराचवेळ वाट पाहूनही आली नाही.त्यामुळे गल्लीतील तीनचाकी सायकल रिक्षा घेऊन सदरील महिला नातेवाईकांसह जिल्हा रुग्णालयाकडे निघाली. या महिलेची पहिलीच प्रसुती असल्याने त्यांना अधिक त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्या रिक्षातून रडत जिल्हा रुग्णालयाकडे जात होत्या. दुपारी १२ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातून हा सायकल रिक्षा जात असताना छायाचित्रकार उत्तम बोरसुरीकर यांनी त्यांना थांबवून विचारणा केली असता सोबतच्या नातेवाईकांनी प्रसुती वेदनेमुळे रडत असल्याचे सांगितले.यावेळी बंदोबस्तावरील उपस्थित पोलीस कर्मचारी गजेंद्र हुसे, पी.एन.कुमावत, सुनिता पाचपुते, वल्लभ धोत्रे, श्रीराम चव्हाण, प्रकाश पंडित हे तेथे आले.एरव्ही रस्त्यावर अनावश्यक फिरणाºयांना लाठ्यांचा प्रसाद देणाºया या कर्मचाºयांना सदरील महिलेच्या डोळ्यातील अश्रू दिसताच, त्यांच्यातील माणुसकी जागी झाली व त्यांनी आत्मियतेने सदरील महिलेची चौकशी केली. त्यानंतर वाहतूक शाखेची जीप बोलावण्यासंदर्भात हालचाली सुरु केल्या.त्याच क्षणी महानगरपालिकेचे मुख्य स्वच्छता निरिक्षक करण गायकवाड व कर्मचारी सुभाष मस्के, वाहनचालक आनंद पवार हे बंदोबस्त लावण्यासाठी येथे ठेवण्यात आलेले बॅरिकेटस् घेऊन जाण्यासाठी वाहनासह आले.त्यानंतर छायाचित्रकार बोरसुरीकर व पोलीस कर्मचारी यांनी गायकवाड यांना सदरील महिलेला तातडीने दवाखान्यात घेऊन जाण्याची विनंती केली. त्यांनीही क्षणाचा विलंब न लावता व हातातील काम बाजुला ठेवून तातडीने या महिलेस वाहनात बसवून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे या महिलेला पुत्ररत्न झाले.
परभणी : प्रसुती वेदनेने विव्हळणाऱ्या महिलेस मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 11:29 PM