लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली शहराची नवी पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आली असून शहरातील विविध वसाहतींमध्ये ४३६ कि.मी. जलवाहिनी अंथरण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या योजनेतून लवकरच पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणातून जलवाहिनीच्या सहाय्याने परभणीकरांना पाणी उपलब्ध केले जाणार आहे़ या योजनेंतर्गत येलदरी येथे उद्भव विहीर, येलदरीपासून १५ किमी अंतरावर प्रक्रिया प्रकल्प त्यानंतर परभणी शहरानजिक धर्मापुरी येथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणीचे काम पूर्ण झाले आहे़ त्याच प्रमाणे परभणी शहरातही जलवाहिनी टाकण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून, आता या योजनेंतर्गत चाचण्या घेणे तसेच इनलेट, आऊटलेट जोडणी ही कामे शिल्लक आहेत़धर्मापुरी येथे जलशुद्धीकरण केंद्राचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे़ या जलशुद्धीकरण केंद्रासाठी लागणाऱ्या पंपांची मागणी नोंदविण्यात आली आहे़ मागणी प्रमाणे या पंपांचे डिझाईन तयार करून ते लवकरच प्राप्त होतील, त्यानंतर जलशुद्धीकरण केंद्रात पंप बसवून हे पाणी शहरातील खाजा कॉलनी आणि विद्यानगर येथे उभारलेल्या दोन एमडीआर जलकुंभामध्ये सोडले जाणार आहे़ या जलकुंभातून शहरातील विविध विभागात पाण्याचे वितरण करण्यासाठी एकूण १७ जलकुंभ उभारण्यात आले आहेत़ त्यामध्ये ६ जलकुंभ अमृत योजनेंतर्गत उभारण्यात आले असून, दोन जलकुंभ युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत उभारण्यात आले आहेत़परभणी शहरामध्ये युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत २६६ किमीची जलवाहिनी अंथरण्यात आली असून, अमृत योजनेंतर्गत १७० किमी अंतराची जलवाहिनी अंथरण्याचे काम पूर्ण झाले आहे़ त्यापैकी १४० किमी अंतरापर्यंत असलेल्या जलवाहिनीची हॅड्रोलिक टेस्टींगही पूर्ण झाली आहे़ काही भागात इनलेट, आऊटलेट क्रॉस कनेक्शन जोडण्याची कामे शिल्लक आहेत़ ती लवकरच पूर्ण होतील, अशी माहिती शहर अभियंता वसिम पठाण यांनी दिली़दरम्यान, येलदरी ते धर्मापुरी या ५२ किमी अंतरात जलवाहिनी अंथरण्यात आली होती; परंतु, त्यातील ७ किमी अंतराची जलवाहिनी महामार्गाच्या आड येत असल्याने ही जलवाहिनी काढून ती रस्त्याच्या कडेने टाकण्याचे कामही सध्या सुरू आहे़ महामार्ग प्राधिकरण हे काम करीत असून, येत्या महिनाभरात काम पूर्ण होईल, असे वसिम यांनी सांगितले़ एकंदर शहरातील नवीन नळ योजनेची कामे जवळपास पूर्ण झाली असून, फिनिसिंग आणि काही चाचण्या शिल्लक आहेत़ पुढील महिन्यात ही सर्व कामे पूर्ण करून सप्टेंबर अखेरपर्यंतच शहरवासियांना नवीन योजनेतून पाणी देण्याचा मानस महापालिकेने वर्तविला आहे़ २००८ मध्ये या योजनेला मंजुरी मिळाली होती़ ११ वर्षांपासून रखडलेली ही योजना आता दृष्टीक्षेपात येत असून, महापालिकेच्या प्रयत्नानुसार सप्टेंबर महिन्यापासून शहरवासियांना नव्या पाणीपुरवठा योजनेतून पाणी मिळाले तर शहराचा पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे़ सध्या तरी शहरवासियांना आणखी एक महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे.दरडोई १३५ लिटर पाणीनवीन पाणीपुरवठा योजनेचे काम प्राधान्याने हाती घेतले आहे़ ते सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करणारच आहोत़ त्यानंतर शहरवासियांना दर दिवशी दर डोई १३५ लिटर पाणी पुरविण्यात येईल़ यासाठी शहरातील व्हॉल्व्हचे नियोजन करण्यात आले असून, प्रत्येक नळाला मीटर बसविणे बंधनकारक केले जाणार आहे, असे मनपा आयुक्त रमेश पवार यांनी सांगितले़
परभणीत सव्वाचारशे किलोमीटरची जलवाहिनी अंथरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:26 AM