लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नसून एक धगधगता विचार आहे़ शिवसेनाप्रमुखांचा विचार महाराष्ट्रातील घराघरापर्यंत पोहचला असून, या विचाराला शिवसैनिकांबरोबरच हितचिंतकाचीही ताकद जोडल्यास आगामी निवडणुकांमध्ये विजयी घोडदौड निश्चित आहे, असा विश्वास खा़ बंडू जाधव यांनी व्यक्त केला़येथील अक्षदा मंगल कार्यालयात ३ नोव्हेंबर रोजी शिवसेनेचे परभणी विधानसभा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर पार पडले़ शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी खा़ जाधव बोलत होते़ यावेळी मार्गदर्शक राम भोजने, जिल्हाप्रमुख विशाल कदम, विधानसभाप्रमुख माणिक पौंढे, युवा अधिकारी अर्जुन सामाले, नगरसेवक अतुल सरोदे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सखुबाई लटपटे, संजय सारणीकर, सदाशिव देशमुख, नंदू आवचार, सोपानराव आवचार, सविता मठपती, कुसूम पिल्लेवाड यांची उपस्थिती होती़ खा़जाधव म्हणाले, सामान्य कार्यकर्त्यांना व्यासपीठ देणारा शिवसेना हा पक्ष आहे़ शिवसेनाप्रमुखांच्या ज्वलंत विचारावर इथला मतदार व कार्यकर्ता प्रभावित झालेला आहे़ त्यामुळेच १९९० पासून आजतागायत परभणी विधानसभा आणि १९८९ पासून लोकसभा शिवसेनेच्या ताब्यात आहे़ ती यापुढेही शिवसेनेच्याच ताब्यात राहणार आहे़ त्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे आपापली जबाबदारी पूर्ण केली तर यश आपलेच आहे, असे ते म्हणाले़ मुख्य मार्गदर्शक राम भोजने म्हणाले, सर्वसामान्य कार्यकर्ता हा पक्षाची ताकद आहे़ कार्यकर्त्यांच्या बळावरच पक्ष उभा असून, एका कार्यकर्त्याने किमान २५ हितचिंतक सोबत घ्यावेत़ शिवसेनेचा गोतावळा मोठा आहे़ त्याला हितचिंतकांची जोड मिळाल्यास यशाचा मार्ग प्रशस्त होवू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़ यावेळी परभणी विधानसभेतील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़
परभणी : शिवसैनिकांना हितचिंतकांची जोड मिळाल्यास यश निश्चित - बंडू जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 12:59 AM