लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पूर्णा तालुक्यातील झिरोफाटा येथून पूर्णाकडे जाणाºया रस्त्यावरील लक्ष्मीनगर ते पूर्णा या रस्त्याचे सद्यस्थितीत अत्यंत मंदगतीने काम सुरू असून, त्याचा दर्जाही राखला जात नसताना सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल सव्वा सहा कोटी रुपयांच्या बिलाची अदायगी संबंधित कंत्राटदाराला केल्याचा प्रकार समोर आला आहे़पूर्णा तालुक्यातील झिरोफाटा येथून पूर्णाकडे जाणाºया रस्त्याची दुरवस्था झाल्याने या रस्त्याचे नव्याने काम करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू होती़ त्या अनुषंगाने शासनाने लक्ष्मीनगर फाटा ते पूर्णा या रस्त्याच्या कामासाठी तब्बल १९ कोटी ४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला़ त्यानंतर हे काम परभणी येथील एका कंत्राटदाराला देण्यात आले़ या कंत्राटदाराने स्वत: हे काम पूर्ण करण्याऐवजी दुसरे तीन उप कंत्राटदार नियुक्त केले़ या निधीतून या १२ किमी रस्त्याची दुरुस्ती, डांबरीकरण तसेच या रस्त्यावर येणारे तीन पूल यांची उभारणी करण्याचे काम समाविष्ट आहे़ हे काम करीत असताना चांगल्या दर्जाचा मुरूम टाकून त्याची चांगली दबाई करणे तसेच डांबरीकरण करण्यासाठीही निकष ठरवून देण्यात आले होते़ त्यानंतर सदरील काम काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले़ ३१ मार्चपर्यंत हे काम पूर्ण करायचे आहे़ परंतु, सद्यस्थितीत त्या दृष्टीकोणातून हे काम होताना दिसून येत नाही़ या कामाचा दर्जा न तपासताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी संबंधित कंत्राटदाराला दोन टप्प्यात काही दिवसांपूर्वी सव्वा सहा कोटी रुपयांच्या बिलाची अदायगी केली आहे़ सद्यस्थितीत लक्ष्मीनगर ते माटेगावपर्यंतच्या ४ किमीच्या अंतरावरील डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे़ त्यापुढे बरमाल नाला, नांदेड टी पाँर्इंट येथे गिट्टी टाकून दबाई सुरू आहे़ या रस्त्यावर येणाºया लहान नळकांडी पुलांचे काम संथगतीने सुरू आहे़ पूर्णा येथील वैभव जिनिंग समोरील कामाला अद्याप सुरुवातच झालेली नाही़ शिवाय ४ कंत्राटदारांमार्फत हे काम करण्यात येत असल्याने जागोजागी हे काम कोठे पूर्ण तर कोठे अर्धवट सोडून देण्यात आले आहे़ त्यामुळे या रस्त्यावर किरकोळ अपघात होत आहेत़ शिवाय या रस्त्यावरील धुळीने वाहनधारक त्रस्त झाले आहेत़ नियमानुसार हे काम येत्या २४ दिवसांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे़ परंतु, सद्यस्थितीत ज्या मंदगतीने हे काम सुरू आहे ते पाहता मार्च महिना संपला तरी हे काम पूर्ण होईल, याची शाश्वती नाही़ विशेष म्हणजे या संपूर्ण कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांचे फारसे लक्ष नाही़ त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे़
परभणी : सा़बां़च्या अधिकाºयांचे दुर्लक्ष : काम मंद गतीने; तरीही सव्वा सहा कोटी वितरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 12:11 AM