लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : तालुक्यातील कुंभारी आणि वांगी येथील वाळू धक्क्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून तेथे अधिकृतपणे वाळू उपसा सुरु होण्यापुर्वीच मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरुअसल्याचे पहावयास मिळत आहे.सध्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हाभरातील वाळू धक्याची ई-निविदा प्रक्रिया सुरु आहे. यामध्ये मानवत तालुक्यातील कुंभारी, वांगी व थार या तीन वाळू धक्यांचा समावेश आहे. या तिन्ही वाळू धक्कावर निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदारांना धक्याचा कायदेशीर ताबा दिला जाणार आहे.जायकवाडीच्या डाव्या कालव्याचे पाणी परळी येथील औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी वळविण्यात आले आहे. त्यामुळे थार येथील वाळू धक्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे; परंतु, वांगी आणि कुंभारी या वाळू धक्यांवर वाळू माफियांनी अवैध वाळू उपसा सुरु केला आहे. यामुळे नदीपात्रात मोठे खड्डे तयार झाले आहेत.रात्रीच्या वेळी ४ ते ५ वाहनांतून वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळते. सध्या वाळू धक्यांचा निविदा प्रक्रियेस विलंब झाल्याने वाळूची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे वाळूच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ५ ब्रास वाळूसाठी ३० ते ३५ हजार रुपये मोजावे लागत आहेत.यामधून अवैध उत्खनन करून वाळूमाफिया मोठ्या प्रमाणात नफा कमावत आहेत. यामध्ये स्थानिक गाव पुढाऱ्यांना सोबत घेऊन गावातील ग्रामस्थांचा विरोध मोडीत काढला जातो. सध्या वांगी आणि कुंभारी येथे नदीपात्रात १० ते १५ फुटापर्यंत खड्डे तयार झाले असून महसूल प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा आहे.या अवैध वाळू उपशावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. या दोन्ही धक्याचा लिलाव झाला असून प्रत्यक्ष ताबा सध्या तरी दिला नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अवैध वाळू उपसा जोरात सुरु आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अवैद्य वाळू उपसा थांबविण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे.
परभणी :मानवत तालुक्यात अवैध वाळू उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:43 PM