लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : घर बांधकामासाठी माहेरहून ५ लाख रुपये घेऊन ये म्हणून पत्नीचा छळ करणाऱ्या पोलीस शिपायास पाथरी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. त.न.कादरी यांनी एक वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.या संदर्भात सरकारी वकील डी.आर.काठुळे यांनी माहिती दिली. त्यानुसार सुमैय्या बेगम यांचे लग्न १५ जुलै २०१२ रोजी पोलीस शिपाई शेख अब्दुल मुश्ताक यांच्या समवेत झाले होते. लग्नानंतर घर बांधकामासाठी ५ लाख रुपयांची मागणी करीत महिलेचा छळ करण्यात आला. तसेच तिला घरातून हाकलून देण्यात आले. या प्रकरणी सुमैय्या बेगम यांनी पाथरी न्यायालयात तक्रार दाखल केली. न्यायालयाच्या आदेशावरुन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारी वकील डी.आर.काठुळे यांनी ६ साक्षीदार तपासले. साक्षीदारांचा जबाब आणि सरकारी वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डॉ.त.न.कादरी यांनी शेख मुश्ताक यास कलम ४९८ अ अन्वये १ वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रक्कमेपैकी ४ हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून फिर्यादीस द्यावेत, असा आदेश दिला.
परभणी : पोलीस शिपायास कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:18 AM