लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक विहिरी, हातपंप, सार्वजनिक नळ योजनाचे दूषित पाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी वापरावे लागत आहे. परिणामी दूषित पाण्यामुळे अनेक आजारांनी ग्रामीण भाग ग्रासला आहे. तालुक्यातील १७० गावांपेकी ५० गावांमध्ये दूषित पाणी आढळून आले आहे.जिंतूर तालुक्यातील भूसकवाडी, सांगळेवाडी, आघाववाडी, नांदगाव, दुधगाव, करवली, मानकेश्वर, निवळी खुर्द, जांब बु., निवळी, सायखेडा, गणपूर, कौसडी, नागठाणा, मालेगाव, दहेगाव, कोठा तांडा, दगडचोप, धमधम, उमरद, धानोरा घागरा, मांडवा, कोलपा, कुºहाडी, येणाली तांडा, आडगाव तांडा दगडवाडी, डोंगरतळा, चितनरवाडी, करवली, मोहाडी, रुपनारवाडी, जांब बु., रायखेडा, निवळी खुर्द, मालेगाव तांडा, गोंधळा, कोसडी, मालेगाव, बोरगळवाडी, वाघी धानोरा, कोठा, कोठातांडा, पिंपळगाव तांडा, घेवडा, विजय नगर, केहाळ अशा ५० गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा आढळून आला आहे. ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीमार्फत हातपंप, सार्वजनिक नळ योजना या ठिकाणी ब्लिचिंग पावडर टाकणे आवश्यक असताना अनेक ग्रामपंचायती ब्लिचिंग पावडर टाकत नाहीत. परिणामी या ५० गावांतील २५ हजार ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. या गंभीर बाबीकडे ग्रामपंचायत, पंचायत समिती, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद या यंत्रणेचे दुर्लक्ष दिसत आहे. विशेष म्हणजे या ५० गावांपैकी २५ गावांमध्ये हातपंप आहेत. काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी व सार्वजनिक नळ योजनेचे पाणी दूषित असल्याने ग्रामीण आरोग्याशी चालणारा हा खेळ पंचायत समिती प्रशासन उघड्या डोळ्याने पाहत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागांमध्ये आरोग्याच्या सुविधा नसताना दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. लहान बालके महिला यांना या दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार मोठ्या प्रमाणात होत आहेत. ही गंभीर बाब गावातील सरपंच, सामाजिक कार्यकर्ते यांना देखील दिसत नसल्याने आरोग्याबाबतची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.ब्लिचिंग: पावडरचा होईना वापर४जिंतूर तालुक्यात १३५ ग्रामपंचायती आहेत. तर १७० गावांमध्ये या ग्रामपंचायतीमार्फत सार्वजनिक पाण्याच्या स्त्रोतामध्ये ब्लिचिंग पावडर टाकली जाते. अनेक ग्रामसेवक मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे सर्व कारभार ग्रामपंचायतीच्या सेवकाकडे व सरपंचाकडे असतो. ग्रामपंचायती लाखो रुपये ब्लिचिंग पावडरवर खर्च करतात. मात्र हे ब्लिचिंग पावडर जाते कुठे? हा प्रश्न निरुत्तर करणारा आहे. अनेक गावांमध्ये सार्वजनिक विहिरी, हातपंप, नळ योजनेच्या पाण्यात पावडर टाकले जात नाही. परिणामी दूषित पाण्याचे स्त्रोत मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. यास ग्रामपंचायत स्तरावरील यंत्रणा जबाबदार असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.नळ योजनेचे पाणी दूषिततालुक्यातील करवली, आघाववाडी, गणपूर, येनोली तांडा, गोंधळा या गावांमध्ये सार्वजनिक नळ योजनेचे पाणी दूषित आहे. हे पाणी संपूर्ण गावातील ग्रामस्थ पिण्यासाठी वापरित असताना पंचायत समितीला मात्र याचे गांभीर्य नाही. त्याच बरोबर तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांचे हातपंप दूषित आहेत. यामध्ये निवळी खुर्द, कोठा तांडा, बोरगळवाडी, वाघीधानोरा या गावांच्या शाळेतील हातपंप दूषित असल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.
परभणी: जिंतूर तालुक्यातील ५० गावांत अशुद्ध पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:02 AM