लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : व्याजाने दिलेले ५ हजार रुपये परत न दिल्याच्या कारणावरून पिस्तूलाचा धाक दाखवत एका तरुणास घरातून उचलून नेऊन मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास शहरातील जवाहर कॉलनी भागात घडली़ या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़परभणी शहरातील जवाहर कॉलनीत राहणाऱ्या ३५ वर्षीय शेख अल्ताफने, सलाऊद्दीन फारुखी याच्याकडून ५ हजार रुपये व्याजाने घेतले होते़ हे पैसे परत मागण्यासाठी सलाउद्दीन फारुखी हा ४ मे रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास शेख अल्ताफ यांच्या घरी सलीम फारुखी, तब्बन फारुखी व शेख साबेर यांच्यासोबत पोहचला़ त्यानंतर अल्ताफच्या घराचा दरवाजा ठोठावला़ घरातील सदस्य जागे झाल्यानंतर या चौघांनी शेख अल्ताफला पैसे परत देण्याच्या कारणावरून मारहाण केली़ त्यानंतर तब्बन फारुखीने, शेख अल्ताफ शेख कालू यांच्या वडिलांच्या डोक्याला पिस्तूल लावून व सलाउद्दीन फारुखीने तलवारीचा धाक दाखवून परिवारा समक्ष अल्ताफला उचलून नेले़ त्यानंतर परिवाराने सकाळपर्यंत अल्ताफ येण्याची वाट पाहिली; परंतु, तो काही आला नाही़ यानंतर अल्ताफला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात आणल्याची माहिती कुटूंबियांना मिळाली़ त्यानंतर त्याचे कुटुंबिय दवाखान्यात पोहोचले व त्यांनी पाहणी केल्यानंतर शेख अल्ताफ हा मृत अवस्थेत आढळून आला़ त्याच्या अंगावर मारहाण केल्याचे व्रण व जखमा झाल्या होत्या़ यावेळी जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी जमली. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत प्रेत ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली़ त्यामुळे रुग्णालयात तणाव निर्माण झाला. दरम्यानच्या काळात नानलपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर फौजफाट्यासह रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी मयताच्या नातेवाईकांशी चर्चा करून आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर वातावरण निवळले. दुपारी ३ वाजता मयताचे शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.मयताचा भाऊ शेख एजाज शेख कालू यांच्या फिर्यादीवरून सलीम फारुखी, सलाउद्दीन फारुखी, तब्बन फारुखी, शेख साबेर यांच्या विरूद्ध नानलपेठ ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन आरोपींना केली अटकगुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी शेख साबेर याला शासकीय रुग्णालय परिसरातून तर तब्बन फारुखी याला पाथरी रोड वरील दंत महाविद्यालयासमोरून सपोनि सुनील पुंगळे, जमादार अशोक सोडगीर, सय्यद उमर, संजय पुरी यांच्या पथकाने अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील पुंगळे हे करीत आहेत़
परभणीतील घटना : ५ हजारांसाठी तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 12:43 AM