लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): दिवाळीच्या सुट्ट्यात प्रवासी गाड्यांना मोठी गर्दी असताना रेल्वे विभागाकडून अचानक गाड्या रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यातच भरीस भर म्हणून मध्य रेल्वेने घेतलेल्या ब्लॉकमुळे नांदेड विभागातून धावणाऱ्या चार गाड्या काही दिवस रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.दिवाळी सुट्ट्या संपल्यानंतर सर्वच रेल्वेगाड्यांना गर्दी आहे. असे असताना मध्यरेल्वे विभागाने २१ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत मनमाड ते दौंड दरम्यान मोठा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे नांदेड विभागातून धावणाºया काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे - निजामाबाद पॅसेंजर २० ते २७ नोव्हेंबर रोजी, निजामाबाद - पंढरपूर २१ नोव्हेंबर तर निजामाबाद-पुणे २२ व २६ नोव्हेंबर रोजी पूर्णपणे रद्द करण्यात आल्या. दिवाळीच्या सुट्या सुरु असताना ऐनवेळी मुगट- मुदखेड दरम्यान रेल्वे ब्लॉक घेतल्याने त्यावेळी गाड्या उशिराने धावल्या होत्या. तर आता दिवाळी सुट्ट्या संपत असताना गाड्या रद्द करण्याच्या या प्रकारामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वे विभागाच्या या कारभाराचा प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
परभणी : रेल्वेगाड्या रद्द झाल्याने प्रवाशांची झाली गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 11:52 PM