लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : स्मशानभूमीच्या प्रश्नावरून अनेक भागात वाद उद्भवतात़ स्मशानभूमीच्या जागेसाठी आंदोलनेही झाल्याचे यापूर्वी जिल्ह्याने अनुभवले आहे़ मात्र या सर्व प्रकारांना फाटा देत पारवा येथील ग्रामस्थांनी एक गाव एक स्मशानभूमी हा संकल्प केला असून, त्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे़स्मशानभूमीच्या जागेवरून वाद होण्याचे प्रकार जिल्ह्यात यापूर्वी घडले आहेत़ त्यामुळे अनेक वेळा पेचप्रसंग निर्माण होतो़ मात्र या सर्वांवर मात करीत परभणी तालुक्यातील पारवा येथे सर्वधर्मीय स्मशानभूमीची संकल्पना मांडण्यात आली आणि या स्मशानभूमीच्या डागडुजीचे काम स्मशानभूमी चळवळीचे कांतराव देशमुख झरीकर यांच्या हस्ते सुरू करण्यात आले़ झरी येथे स्मशानभूमीला जमीन दान केल्यानंतर ही स्मशानभूमी सर्व जातीधर्मासाठी खुली करून कांतराव देशमुख यांनी आदर्श निर्माण केला आहे़ सद्यस्थितीला झरी येथील स्मशानभूमी पाहण्यासारखी तयार करण्यात आली आहे़ याचाच आदर्श घेऊन जांब ग्रामस्थांनी सुंदर स्मशानभूमी बनविण्याचे काम हाती घेतले आहे़जांब या गावाला लागूनच असलेल्या पारवा येथील ग्रामस्थांनीही स्मशानभूमीच्या सुशोभिकरणाचा संकल्प केला़ १८ जून रोजी कृषीभूषण कांतराव देशमुख यांच्या हस्ते या कामास सुरुवात करण्यात आली़ या गावातील ग्रामस्थांचे वैशिष्ट्य म्हणजे गावात सर्व जाती धर्मासाठी एकच स्मशानभूमी आहे़ कुठलाही वाद नसल्याने या गावाने जिल्हावासियांसमोर एक आदर्श ठेवला आहे़गावकऱ्यांनी एकजुटीने काम करून स्मशानभूमी स्वच्छ व सुंदर करावी, स्मशानभूमी स्वच्छ, सुंदर करण्यासाठी नेमक्या कुठल्या पद्धतीने काम करावे, या विषयीची माहिती कांतराव देशमुख यांनी यावेळी दिली़ गावात तसेच स्मशानभूमी परिसरात उंबर, वड, पिंपळ अशी देशी झाडे लावावीत, या झाडांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो़ स्मशानभूमीच्या विकासासाठी आपण सर्व तोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही कांतराव देशमुख यांनी यावेळी दिली़ कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते़
परभणी : एक गाव एक स्मशानभूमीचा अभिनव संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 11:29 PM