सुभाष सुरवसे।लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी): भक्तांच्या हाकेला धावणारी व मनोमन इच्छा पूर्ण करणारी देवी म्हणून सोनपेठ शहरातील जगदंबा देवी परिचित आहे. या मंदिर संस्थानच्या वतीने २९ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली आहे. या महोत्सवास तालुक्यासह जिल्ह्यातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.सोनपेठ शहरातील आराध्य दैवत म्हणून जगदंबा देवीची ओळख आहे. या मंदिराचे वैशिष्ट्ये म्हणजे १२५ वर्षापूर्वी व २०१२ मध्ये असा दोनवेळा जिर्णोद्धार करण्यात आला आहे. या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात दोन देवींच्या मूर्ती विराजमान आहेत. मंदिराच्या समोरील गाभाºयातील मुख्य दर्शनी श्री तुळजापुरची आई तुळजाभवानी विराजमान आहेत. गाभाºयातील तुळजाभवानी मातेच्या बाजूस माहुरची रेणुकादेवी विराजमान आहे. पुरातन कालीन मूर्तीचे कोरीव काम घडविलेले आहे. मुख्य मंदिर हे दगडाचे असून पूर्णत: चीरबंदी आहे. मंदिरात २५ ते ३० फूट लांबीच्या नक्षीदार सागवानी लाकडाच्या स्तंभावर मंदिराचे देखणे घूमट उभे आहे. तर मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मोठ्या परिसरात भोजन कक्षाची व्यवस्था करण्यात येते. जगदंबा देवी मंदिर संस्थानच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी विधीवत व परंपरागत घटस्थापना करून शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ झाला आहे. त्याच बरोबर धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कीर्तन, भक्ती संगीताचा कार्यक्रम, संगीत मैफिल, भारूड, गोंधळ तसेच दररोज सप्तसितीचे पाठ आदी विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. नवमीच्या दिवशी विधीवत होमहावण व पूर्णाहुतीचा कार्यक्रम पार पडतो. विजयादशमीच्या दिवशी पालखी मिरवणूक काढली जाते. नवरात्रोत्सवाची सांगता कोजागिरी पौर्णिमेला देवीच्या छबीन्याने केली जाते. दरम्यानच्या भक्तांच्या हाकेला देवी म्हणून परिचित असलेल्या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी भाविक नऊ दिवस मोठी गर्दी करतात.
परभणी : भक्तांच्या हाकेला धावणारी सोनपेठ येथील जगदंबा देवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 1:00 AM