लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निर्मलाताई विटेकर आणि उपाध्यक्षपदी अजय चौधरी यांची निवड झाल्यानंतर आता विषय समित्यांच्या निवडीकडे सदस्यांचे लक्ष लागले आहे़ राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या दोन सभापती पदासाठी पक्षांतर्गत स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे़जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निर्मलाताई विटेकर व उपाध्यक्षपदी अजय चौधरी यांची ७ जानेवारी रोजी बिनविरोध निवड झाली़ जि़प़मध्ये महाविकास आघाडीचे ४३ सदस्य असताना भाजपाच्या ५ व रासपच्या ३ सदस्यांनीही महाविकास आघाडीलाच साथ देण्याचा निर्णय घेतला़ त्यामुळे आता जिल्हा परिषदेत विरोधी पक्ष नसल्यागत स्थिती निर्माण झाली आहे़ अशा स्थितीत आता जि़प़तील विषय समित्यांच्या निवडीचा कार्यक्रम कधी जाहीर होतो, याकडे जि़प़ सदस्यांचे लक्ष लागले आहे़ अध्यक्ष व उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला गेले असून, अन्य दोन सभापतीपदे राष्ट्रवादीकडे राहू शकतात़ तर काँग्रेस व शिवसेनेला प्रत्येकी एक सभापती पद मिळण्याची शक्यता आहे़ यापूर्वी जि़प़ उपाध्यक्षांकडे असलेले शिक्षण व आरोग्य खाते बदलले जाण्याची शक्यता असून, त्याऐवजी बांधकाम व अर्थ खाते उपाध्यक्ष चौधरी यांना मिळण्याची शक्यता आहे़ त्यामुळे शिक्षण व आरोग्य सभापतीपद स्वतंत्ररीत्या निर्माण होण्याची शक्यता आहे़ तसेच समाजकल्याण सभापतीपदही राष्ट्रवादीकडेच राहणार आहे़ विशेष म्हणजे शिक्षण व आरोग्य आणि समाजकल्याण ही दोन्ही सभापतीपदे जिंतूर मतदारसंघाकडेच राहण्याची दाट शक्यता आहे़ असे असले तरी जिंतूर मतदार संघात सभापतीपदासाठी अनेक दिग्गजांनी तयारी सुरू केली आहे़ त्यातून सदस्यांतर्गत स्पर्धा सुरू झाल्याचे पहावयास मिळत आहे़ माजी आ़ विजय भांबळे यांच्या मर्जीतील सदस्यांनाच ही सभापतीपदे मिळणार आहेत़दरम्यान, महिला व बालकल्याण हे सभापतीपद शिवसेनेला मिळण्याची शक्यता असून, कृषी व पशुसंवर्धन हे सभापतीपद काँग्रेसच्या वाट्याला येऊ शकते़ किंवा या दोन सभापतीपदांमध्ये आदलाबदली होवू शकते़ जि़प़तील महाविकास आघाडीच्या सत्तेचा फॉर्म्युला ठरला त्यावेळीच वरिष्ठ नेत्यांमध्ये या सभापतीपदाबाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे़भाजपा, रासपच्या सदस्यांची झाली गोची४जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेची महाविकास आघाडी सत्तेत आली आहे़ या महाविकास आघाडीला विरोध करण्याचे धारिष्ट्य भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय समाज पक्षाच्या सदस्यांना दाखविता आले नाही़ त्यांनी महाविकास आघाडीला एक प्रकारे समर्थन दिले़ असे असताना त्यांना सत्तेतील वाटा मिळण्याचा संबंधच नाही़ शिवाय हे दोन्ही पक्ष राज्यस्तरावर महाविकास आघाडीच्या विरोधात आहेत़ त्यामुळे जि़प़ तही त्यांना काम करताना अडचणी येऊ शकतात़ असे असतानाही त्यांची पदाधिकारी निवडणुकीतील चुप्पी हितकारक ठरेल की नुकसानदायक; हे आगामी काळात कळणार आहे़
परभणी : सभापतीपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 12:31 AM