लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : ऊसतोड टोळीला देण्यासाठी घेतलेले पैसे परत मागू नये म्हणून सोलापूर जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारास गंगाखेड येथे १६ दिवस डांबून ठेवत मारहाण केल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात २१ डिसेंबर रोजी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या बाबुराव रामा डिकोळे (५१ रा. घाटने ता. म्हाढा जि.सोलापूर ह.मु. कुर्डूवाडी) यांनी गंगाखेड येथील लक्ष्मण गोविंद गायकवाड यांना ऊसतोडीची टोळी करण्याकरीता ८ लाख ४० हजार रुपये दिले होते.बाबुराव रामा डिकोळे यांनी हे पैसे परत मागू नये म्हणून लक्ष्मण गोविंद गायकवाड, अजय लक्ष्मण गायकवाड, विजय लक्ष्मण गायकवाड व अन्य तीन अनोळखी व्यक्तींनी २२ नोव्हेंबर रोजी ८ वाजेपासून ते ९ डिसेंबर रोजीच्या पहाटे ३ वाजेपर्यंत असे १६ दिवस गंगाखेड येथे डांबून ठेवत जबर मारहाण करुन दात पाडीत जीवे मारण्याची धमकी दिली. व गंगाखेड बसस्थानकाजवळ आणून सोडले. यावरुन १० डिसेंबर रोजी बाबुराव डिकोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात शून्याने गुन्हा दाखल करुन २१ डिसेंबर रोजी रात्री उशिराने गंगाखेड पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात हे करीत आहेत.
परभणी : ऊस वाहतूकदारास १६ दिवस ठेवले डांबून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:30 AM