लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील साईबाबा माध्यमिक विद्यालयाची इमारत पूर्णत: मोडकळीस आली असून, या विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या ६०० विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन करावे लागत आहे़जिंतूर तालुक्यातील येलदरी परिसरात साईबाबा माध्यमिक विद्यालय आहे़ या विद्यालयात इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे ६०० विद्यार्थी शिक्षण घेतात़ या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी १९ शिक्षक कार्यरत आहेत़ या विद्यालयाचा निकाल चांगला असल्याने येलदरीसह परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी ये-जा करतात़ परंतु, गेल्या काही दिवसांपासून या शाळेची इमारत पूर्णपणे मोडकळीस आली आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन करावे लागत आहे़विशेष म्हणजे या शाळेच्या इमारतीच्या तीन वर्ग खोल्या पूर्णत: कोसळल्या आहेत़ तर उर्वरित वर्ग खोल्यांना तडे गेले आहेत़ विशेष म्हणजे याबाबत पालकवर्ग व विद्यार्थ्यांनी अनेकदा विद्यालय प्रशासनाकडे इमारत दुरुस्त करावी, अशी मागणी लावून धरली; परंतु, विद्यालय प्रशासनाने या विद्यार्थी व पालकांच्या मागणीला केराची टोपली दाखविली़ काही दिवसांत या शाळेची दुरुस्ती केली नाही तर मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे याकडे विद्यालय प्रशासनाने लक्ष देऊन विद्यार्थ्यांचा विचार करून नवीन वर्गखोल्यांमध्ये शाळा सुरू करावी, अशी मागणी होत आहे़प्रसाधनगृहाचीही दुरवस्था४येलदरी येथील साईबाबा विद्यालयाची इमारत पूर्णत: मोडकळीस आल्याने विद्यार्थ्यांना भीतीदायक वातावरणात शिक्षण घ्यावे लागत आहे़ त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी असलेले प्रसाधनगृह देखील पूर्णत: मोडकळीस आले आहे़ परिणामी, विद्यार्थ्यांना उघड्यावरच लघुशंका करावी लागत आहे़ त्यामुळे विद्यालय प्रशासन व शिक्षण विभागाने लक्ष देऊन विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करावी व पुढचा अनर्थ टाळावा, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे़
परभणी : सहाशे विद्यार्थ्याचे जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:27 AM