लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वर्षानुवर्षे पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून ऐनवेळी पक्षात प्रवेश करणाºया किंवा बाहेर जिल्ह्यातील व्यक्तीला निवडणुकीची उमेदवारी देऊन शिवसेना- भाजपाकडून निष्ठावंतांची गळचेपी करण्याचे काम सुरुच आहे. त्यामुळे पक्षासाठी खस्ता खाणाºया कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे.परभणी-हिंगोली विधानपरिषद मतदारसंघात शिवसेनेने अकोला येथील बिप्लव बाजोरिया यांना उमेदवारी जाहीर केली आहे. बाजोरिया यांचा यापूर्वी परभणीशी काहीही संबंध आलेला नाही. विशेष म्हणजे परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. अनेक वर्षापासून परभणीकरांनी शिवसेनेला भरभरुन मते दिली आहेत. त्यामुळे विधानपरिषदेची उमेदवारी देताना परभणी किंवा हिंगोली जिल्ह्यातील इच्छुकाचा प्राधान्याने विचार होणे महत्त्वाचे होते. परंतु, असे न होता थेट मुंबईतूनच विदर्भातील उमेदवार दोन्ही जिल्ह्यावर लादल्याने निष्ठावान शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. तसेच परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यात शिवसेनेला तगडा उमेदवार भेटला नाही की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अशीच काहीशी परिस्थिती भाजपातही पहावयास मिळत आहे. पक्षाची देशात सत्ता नसताना अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी पक्षासाठी मेहनत घेतली. प्रत्येक निवडणुकीमध्ये विजय मिळणार नाही, हे माहीत असतानाही पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळली. आता पक्षाला देशभरात चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे अनेक वर्षे पक्षाचे निष्ठेने काम करणाºया कार्यकर्त्याला निवडणुकीत संधी देणे आवश्यक आहे; परंतु, अशा कार्यकर्त्यांना डावलून ऐनवेळी इतर पक्षातून एंन्ट्री केलेल्या उमेदवारांना अधिक महत्त्व दिले जात असल्याने जुने कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. आयुष्यभर पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन जनमाणसांत पक्षाची भूमिका पोहचविण्याचे कार्य करणाºयांच्या नशिबी उपेक्षाच येत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. विधानपरिषद निवडणुकीत विजयासाठी आर्थिक बाजू भक्कम असावी, असे सांगितले जाते. मग, पक्षीय पातळीवर निष्ठावान कार्यकर्त्यांना या अनुषंगाने का ताकद दिली जात नाही, असाही सवाल उपस्थित होत आहे.कोणत्याही विशिष्ट उमेदवाराची शिफारस केली नाही -लोणीकरपरभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्यसंस्था मतदारसंघासाठी उमेदवारी देण्याकरीता आपण कोणत्याही विशिष्ट उमेदवाराची शिफारस केली नसून भाजपाचा जो कोणी उमेदवार असेल, त्याला निवडून आणण्यासाठी शर्तीने प्रयत्न करणार असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये सांगितले आहे. संपर्कमंत्री म्हणून विधानपरिषद मतदारसंघातील मतदारांचे पक्षीय बलाबल याबाबतची वस्तुस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. परभणी- हिंगोली जिल्ह्यातील पक्षाचे आ.मोहन फड, आ.तानाजी मुटकुळे यांच्यासोबत चर्चा केली आहे. मुख्यमंत्री, भाजपा कोअर कमिटी जो उमेदवार देईल, त्या उमेदवाराच्या विजयासाठी एकदिलाने काम करु, असेही या प्रसिद्धीपत्रकात लोणीकर यांनी म्हटले आहे.आ. दुर्राणी गुरुवारी अर्ज दाखल करणारराष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ.बाबाजानी दुर्राणी हे ३ मे रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ.विजय भांबळे, आ.मधुसूदन केंद्रे यांच्यासह काँग्रेस व मित्र पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेसचे जि.प., न.प. सदस्य, पं.स.सभापती, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी भवन येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. येथून रॅली काढून अर्ज दाखल केला जाणार असल्याचे राष्ट्रवादीच्या वतीने सांगण्यात आले.
परभणी : सेना-भाजपाच्या निष्ठावंतांची गळचेपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 12:17 AM