परभणी: विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवार हे परभणी शहरामध्ये रविवारी एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी आले होते. जिंतूर रोड येथील द्यानोपासक महाविद्यालय मैदानावरील कार्यक्रम पूर्ण झाल्यावर त्यांचा शासकिय वाहनांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ होत असताना रेल्वे स्थानकाच्या समोरील महामार्गावर तीन ते चार जणांनी काळे झेंडे दाखविले. यानंतर पोलिसांनी त्या तीन ते चार जणांना ताब्यात घेतले आहे.राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे नांदेड येथून रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास परभणीत दाखल झाले होते. त्यांनी जिंतूर रोड भागात ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावरील भगवान गौतम बुद्ध मूर्ती वाटपाच्या धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावली. हा कार्यक्रम आटोपून त्यांच्या ताफा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला.
यावेळी रेल्वे स्टेशनसमोर पाच ते सहा मराठा आरक्षण आंदोलकांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. तसेच मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. यानंतर ताफा जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला. त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्याची दुष्काळी आढावा बैठक घेतली.