लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार सुरेश नागरे यांनी शिवसेना- भाजपा युतीचे उमेदवार विप्लव बाजोरिया यांना पाठिंबा दिल्याने आता या मतदारसंघात युती व आघाडीत सरळ लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी सोमवारी मतदान होणार आहे. या मतदारसंघात काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे सुरेश देशमुख, शिवसेना-भाजपा युतीचे विप्लव बाजोरिया आणि अपक्ष सुरेश नागरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या तिन्ही उमेदवारांचे अर्ज कायम होते. शुक्रवारी जिंतूर येथे नागरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपा- शिवसेना युतीचे उमेदवार विप्लव बाजोरिया यांना बिनशर्त पाठिंबा दिल्याची माहिती दिली. यावेळी खा.संजय जाधव, माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर, हिंगोलीचे भाजपाचे आ.तानाजी मुटकुळे, माजी खा. शिवाजी माने, आ. गोपीकिशन बाजोरिया, माजी आ.गजानन घुगे, उमेदवार विप्लव बाजोरिया, भाजपा जिल्हाध्यक्ष अभय चाटे, परभणी शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, जि.प.सदस्य राम खराबे पाटील आदींची उपस्थिती होती. नागरे हे गेल्या काही दिवसांपासून माघार घेणार असल्याची चर्चा सुरु होती. या चर्चेवर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे आता काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुरेश देशमुख व शिवसेना- भाजपा युतीचे उमेदवार विप्लव बाजोरिया यांच्यात सरळ लढत होत आहे. सोमवारी यासाठी मतदान होणार असल्याने व प्रचारासाठी अवघ्या दोन दिवसांचाच कालावधी शिल्लक असल्याने दोन्ही उमेदवारांनी मतदारांशी संपर्क वाढविला आहे.पालम-गंगाखेडचे मतदार सहलीवर रवानाविधानपरिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडाबाजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपले मतदार फुटू नयेत, यासाठी उमेदवारांकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. याचाच एक भाग म्हणून पालम येथील विविध पक्षांचे काही तर गंगाखेड येथील ७ नगरसेवक सहलीवर गेले आहेत. हे नगरसेवक थेट सोमवारीच मतदानाच्या वेळी उपस्थित राहणार आहेत. अन्य काही ठिकाणच्या नगरसेवकांनाही सहलीवर पाठविण्याच्या हालचाली शुक्रवारी सायंकाळी सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. प्रचारासाठी काही तासच शिल्लक राहिल्याने उमेदवार पूर्ण तयारीनिशी प्रचाराला लागले आहेत.
परभणी विधानपरिषद निवडणूक: सुरेश नागरे यांचा बाजोरिया यांना पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:24 AM