लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायती आणि नगरपालिका, जिल्हा परिषदेतील सदस्यांची संख्या वाढल्याने तसेच नगराध्यक्षांच्या निवडी थेट जनतेतून झाल्याने परभणी-हिंगोली विधान परिषद मतदार संघात ९३ मतदार वाढले आहेत. त्यामुळे यावेळेस उमेदवारांवर प्रचारासाठी आर्थिक बोझाही वाढणार असल्याची चिन्हे आहेत.जून महिन्यात रिक्त होणाऱ्या राज्यातील विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. परभणी जिल्ह्यामध्ये परभणी आणि हिंगोली असा दोन जिल्ह्यांचा विधानपरिषद मतदारसंघ असून या मतदारसंघातून एक सदस्य निवडणूक द्यायचा आहे. सध्या ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे.विधान परिषदेसाठी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर पंचायतींचे निर्वाचित व स्वीकृत सदस्य तसेच पंचायत समितींचे सभापती मतदार आहेत. मागील वेळेच्या निवडणुकीमध्ये परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामधील मतदारांची संख्या ४०९ एवढी होती. यावेळेच्या निवडणुकीत मात्र ५०२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे यावर्षी ९३ मतदारांची भर पडली आहे.वर्षभरापूर्वी पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष हे थेट जनतेमधून निवडण्याचा निर्णय झाला. त्यामुळे परभणी आणि हिंगोली दोन्ही जिल्ह्यातील १० नगराध्यक्षांची नव्याने मतदार म्हणून भर पडली आहे. तसेच परभणी जिल्ह्यामध्ये पालम आणि हिंगोली जिल्ह्यात औंढा व सेनगाव या तीन ग्रामपंचायती नगरपंचायतींमध्ये रुपांतरित झाल्याने या नगरपंचायतींचे नगरसेवक विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदार म्हणून पात्र ठरले आहेत. त्याचप्रमाणे पाथरी, मानवत, जिंतूर, गंगाखेड आणि पूर्णा नगरपालिकेमध्ये प्रत्येकी १ नगरसेवकाचे पद वाढले आहे. तर सेलू नगरपालिकेत दोन नगरसेवक वाढले आहेत. जिल्ह्यात ७ नगराध्यक्ष आणि ७ नगरसेवक असे नगरपालिकेचे १४ मतदार वाढले आहेत. त्याचप्रमाणे गतवेळेच्या निवडणुकीत परभणी जिल्हा परिषदेत ५२ सदस्य होते. यावेळेच्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्यांची संख्या ५४ झाली आहे. हिंगोली जिल्हा परिषदेतील सदस्यांची संख्या ५० वरुन ५२ एवढी झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्येही वाढ झाली असून यावर्षी प्रथमच नगरपालिकांच्या स्वीकृत सदस्यांनाही विधानपरिषदेसाठी मतदानाचा अधिकार मिळाला आहे. त्यामुळे २४ स्वीकृत सदस्यांची मतदार म्हणून भर पडली आहे.विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये पक्षीय ताकदीबरोबरच लक्ष्मीअस्त्रही प्रभावी ठरत असल्याचे यापूर्वीच्या निवडणुकांवरुन दिसून आले. त्यामुळे पक्षीय बलाबल लक्षात घेण्याबरोबरच इतर पक्षांच्या मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी आर्थिक गणिते देखील जुळविली जातात. यंदाच्या निवडणुकीत ९३ मतदारांची भर पडल्याने या मतदारांना आपल्या बाजुने मतात रुपांतरित करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना अधिकचा खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीत उमेदवारांचा खर्च वाढणार आहे.अशी आहे मतदारांची संख्यापरभणी महानगरपालिका ६५, परभणी-हिंगोली जिल्हा परिषद १०६, पंचायत समिती सभापती १४, नगरपालिका सदस्य २२२, स्वीकृत सदस्य २६, नगरपंचायत सदस्य ५३, नगराध्यक्ष १२.
परभणी : विधान परिषदेसाठी वाढले ९३ मतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:14 AM