लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आईच्या हाताला धरून रेल्वेत चढत असताना अचानक पाय निसटला व त्याक्षणी रेल्वे सुरू झाल्याने चिमुकलीचा जीव धोक्यात आल्याची काळजाचा ठोका चुकविणारी घटना घडत असताना क्षणात राहुल मोगले यांनी साखळी ओढून रेल्वे थांबविल्याने पुढील अनर्थ टळल्याची घटना मंगळवारी रात्री ८़३० च्या सुमारास मानवतरोड येथे घडली़औरंगाबाद-हैदराबाद ही पॅसेंजर रेल्वे मंगळवारी रात्री ८़३० च्या सुमारास मानवत रोड रेल्वेस्टेशनवर आली़ यावेळी पाथरी येथील मथुरा कॉलनीतील एक मुस्लीम दाम्पत्य आपल्या दुसरीमध्ये शिक्षण घेणाऱ्या ८ वर्षीय व ५ वर्षीय मुलासह हैदराबादला जाण्यासाठी रेल्वेमध्ये बसण्याच्या तयारीत होते़ त्यांना आरक्षित कोच सापडत नसल्याने त्यांची धावपळ सुरू होती़ रेल्वेस्टेशनवरील वीज पुरवठा खंडीत झाल्याने अंधाराची त्यात भर पडली़ या क्षणी गाडीने हॉर्न दिला़ त्याचवेळी मुस्लीम दाम्पत्य रेल्वेमध्ये चढले़ आठ वर्षीय तहनियत ही आईच्या हाताला धरून रेल्वे चढत असताना अचानक रेल्वे सुरू झाली़ त्याक्षणी तहनियतचा पायºयावरील पाय निसटला़ त्यामुळे तहनियतच्या आईने तिचा हात घट्ट पकडून जोराने आरडाओरडा केला़ रेल्वे पुढे जात असताना मुलगी पडत आहे़, असा गोंधळ उडाल्याने या रेल्वे डब्यातून औरंगाबादहूनपरभणीला प्रवास करणारे राहुल मोगले यांच्या निदर्शनास ही बाब आली़ त्यांनी तातडीने व ताकदीने रेल्वेची चैन ओढण्यास सुरुवात केली़ परंतु, ती जाम असल्याने त्यांनी त्या चैनला लटकून पूर्ण ताकद लावली़ त्याक्षणी रेल्वे जागेवर थांबली़ त्यानंतर तहनियतला तिच्या आईने रेल्वेत ओढून घेतले़ त्यामुळे सर्वांचाच जीव भांड्यात पडला़ बहुतांश प्रवासी या चिमुकलीची विचारपूस करण्यासाठी जमा झाले़ घडलेल्या प्रसंगामुळे ८ वर्षीय तहनियत ही भेरदली होती़ काय बोलावे तिला समजत नव्हते़ तिकडे मोठ्या संकटातून आपली चिमुकली वाचल्याने तिच्या आईच्या डोळ्यातूनही अश्रू येत होते़ प्रवाशांनी समजूत काढल्यानंतर तहनियतची आई शांत झाली़ काही वेळानंतर राहुल मोगले यांच्याजवळ तहनियत येऊन बसली़यावेळी तिला पाणी पाजण्यात आले़ राहुल यांनी तहनियतची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला़ तसेच तिला हसविण्याचाही प्रयत्न केला़काही वेळानंतर तहनियतच्या चेहºयावर स्मितहास्याची रेष उमटली़ यावेळी उपस्थित तहनियतच्या आईनेही राहुल यांचे आभार मानले़ ‘भैय्या आपका बहोत बहोत शुक्रीया, आपकी वजहसे मेरी बच्ची की जान बच गयी’ असे सांगून कृतज्ञता व्यक्त केली़इतर उपस्थित प्रवाशांनीही राहुल मोगले यांचे कौतुक केले़ पुढील स्टेशन आल्यानंतर पाथरीचे हे दाम्पत्य त्यांच्या आरक्षित डब्यातील जागेवर रवाना झाले़
परभणी : राहुलच्या सतर्कतेने वाचले चिमुकल्या तहनियतचे प्राण; रेल्वेत चढताना निसटला होता पाय; आईनेही केली प्रयत्नांची पराकाष्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:03 AM