लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विधानपरिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक संस्था मतदारसंघासाठी निवडणूक विभागाने मतदारांची प्रारुप यादी जाहीर केली असून २७ एप्रिलपर्यंत या यादीवर दावे व हरकती मागविल्या आहेत.विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून परभणी - हिंगोली स्थानिक संस्था मतदारसंघातून एक सदस्य निवडून द्यावयाचा आहे. या निवडणुकीची आचारसंहिता दोन्ही जिल्ह्यात लागू झाली आहे. प्रशासनाने निवडणूक प्रक्रियेची तयारी सुरु केली असून या अंतर्गत २१ एप्रिल रोजी प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात आली. एकूण ५०३ मतदारांचा या यादीत समावेश आहे. त्यात परभणी जिल्हा परिषदेचे ६३ सदस्य, महापालिकेचे ७० सदस्य, जिंतूर नगरपालिका २६, सेलू पालिका २८, गंगाखेड पालिका २८, पूर्णा २३, पाथरी २३, मानवत २२ आणि सोनपेठ नगरपालिकेच्या २० सदस्यांचा समावेश आहे. तर पालम नगरपंचायतीच्या १९ सदस्यांचा मतदार म्हणून या यादीत समावेश आहे.हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे ५७ सदस्य, वसमत नगरपालिकेचे ३२, हिंगोली नगरपालिकेचे ३६, कळमनुरी नगरपालिकेचे २० सदस्य आणि औंढा नगरपंचायतीचे १९ व सेनगाव नगरपंचायतीच्या १७ सदस्यांचा मतदार म्हणून समावेश करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे पंचायत समितीचे सभापती, महापालिका आणि नगरपालिकांचे स्वीकृत सदस्यही या निवडणुकीसाठी मतदार म्हणून पात्र आहेत.दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व तहसील, महापालिका आणि नगरपालिका कार्यालयामध्ये ही प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.या यादीवर २७ एप्रिलपर्यंत आक्षेप दाखल करता येणार असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी , महापालिकेचे आयुक्त यांच्याकडे हे आक्षेप स्वीकारले जातील. त्यानंतरच अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.२६६ महिला मतदारांचा समावेशविधान परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी जाहीर झाली असून त्यात ५०३ मतदारांपैकी २६६ मतदार हे महिला मतदार आहेत. तर पुरुष मतदारांची संख्या २३७ एवढी आहे.
परभणी :५०३ मतदारांची प्रारुप यादी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:52 AM