लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात ज्या प्रकल्पांवर पिण्याच्या पाण्याची मदार अवलंबून आहे, अशा येलदरी प्रकल्पासह इतर १६ प्रकल्पांमधील जीवंत पाणीसाठा संपल्याने टंचाईचे संकट आतापासूनच गडद होत आहे़ टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा केलाही जाईल; परंतु, टँकरसाठी पाणी आणायचे कोठून? असा ही प्रश्न निर्माण होत आहे़जिल्ह्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती अधिक तीव्र झाली आहे़ मागील अनेक वर्षांच्या तुलनेमध्ये यावर्षी प्रथमच परतीचा पाऊस झाला नाही़ त्यामुळे पावसाळ्यापासूनच जिल्ह्यात टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होण्यास सुरुवात झाली़ आॅक्टोबर महिन्यात जिल्हा प्रशासनाने टंचाई कृती आराखडा तयार करून पाणीसाठ्याचे नियोजन केले़ आॅक्टोबर महिन्यामध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा पिण्यासाठी राखीव करण्यात आला; परंतु, प्रत्यक्षात जुलै महिना उजडण्यापूर्वीच अनेक प्रकल्पांनी तळ गाठला आहे़ त्यामुळे प्रकल्पातील पाणी राखीव केले असले तरी पाणीच नसेल तर ते द्यायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे़जिंतूर तालुक्यातील येलदरी हा या जिल्ह्यातील मुख्य प्रकल्प असून, मासोळी व करपरा हे दोन मध्यम प्रकल्प आणि २२ लघु प्रकल्प जिल्ह्यात आहेत़ या प्रकल्पांमधून शहरी भागासह ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना चालविल्या जातात़ मात्र प्रकल्पात पाणी नसल्याने योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत़ उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पात ० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ ९३४ दलघमी क्षमतेचा हा प्रकल्प असून, त्यात केवळ १०५ दलघमी पाणी मृतसाठ्यात शिल्लक आहे़ तसेच गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पातही जीवंत पाणीसाठा उपलब्ध नाही़ या प्रकल्पाची साठवण क्षमता ३४़८१ दलघमी एवढी असून, मृतसाठ्यामध्ये ५ दलघमी पाणी शिल्लक आहे़ जिंतूर तालुक्यातल्या करपरा मध्यम प्रकल्पात ४़६ दलघमी जीवंत पाणीसाठा उपलब्ध आहे़ या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता २८ दलघमी एवढी आहे़ क्षमतेच्या तुलनेत उपलब्ध असलेले पाणी अतिशय कमी असून, हे पाणी जुलै महिन्यापर्यंत पुरणे शक्य नाही़जिल्ह्यातील २२ लघु प्रकल्पांपैकी बहुतांश लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत़ या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा शिल्लक आहे, तोही १ ते २ दलघमीच्या आसपास आहे़ त्यामुळे उपलब्ध असलेला पाणीसाठा पिण्यासाठी मिळण्याची शक्यता कमी आहे़परभणी तालुक्यामध्ये पेडगाव येथील लघु प्रकल्पात केवळ ०़१ टक्का पाणीसाठा शिल्लक असून, या प्रकल्पाची स्थिती कोरड्या प्रकल्पासारखीच आहे़ अशाच प्रकारे पाथरी तालुक्यातील झरी तलावात १ दलघमी, तांदूळवाडी तलावात ०़६७ दलघमी, राणीसावरगाव ०़१२३, टाकळवाडी ०़०४, कोद्री ०़२६, पिंपळदरी ०़१५, वडाळी, ०़४४, चारठाणा ०़४९, केहाळ ०़०३, कवडा २़२७ आणि मांडवी तलावात ०़५२ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे़ या सर्व पाणीसाठ्याची एकूण बेरीज ३ दलघमीच्या आसपास होते़ त्यामुळे हे पाणी किती दिवस पुरेल असा प्रश्न निर्माण झाला आहे़ प्रकल्पाची सध्याची स्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील पाण्याची टंचाई आतापासूनच गंभीर रुप धारण करीत आहे़मृतसाठ्यावरच परभणीकरांची भिस्तप्रकल्पांमधील जीवंत पाणीसाठा संपल्याने दुष्काळग्रस्त नागरिकांना पिण्याचे पाणी देण्यासाठी मृतसाठ्यातील पाणी उचलावे लागणार आहे़ दुष्काळी परिस्थितीमध्ये हा पाणीसाठा पिण्याचे पाणी म्हणून वापरण्याची वेळ प्रशासनावर आली आहे़ येलदरी प्रकल्पात १०५ दलघमी पाणी मृतसाठ्यात उपलब्ध आहे़ तर निम्न दूधना प्रकल्पाच्या मृतसाठ्यात १०२ दलघमी पाणी शिल्लक आहे़ मासोळी प्रकल्पातील मृतसाठ्यात ५ दलघमी आणि करपरा प्रकल्पातील मृतसाठ्यात ३़९ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे़ विशेष म्हणजे जिल्ह्यातील प्रकल्पांमधील गाळ मागील अनेक वर्षांपासून उपसला नाही़ त्यामुळे मृतसाठ्यात पाण्याच्या बरोबरीने गाळही साचला आहे़ ही बाब लक्षात घेता मृतसाठ्यातून केवळ निम्मेच पाणी जिल्हावासियांना मिळण्याची चिन्हे आहेत़हे तलाव पडले कोरडेठाकलघु तलावांपैकी आंबेगाव, नखातवाडी, दगडवाडी, डोंगरपिंपळा, भेंडेवाडी, देवगाव, जोगवाडा, बेलखेडा, चिंचोली, आडगाव, भोसी आणि दहेगाव हे १२ लघु प्रकल्प कोरडेठाक पडले असून, या प्रकल्पात पाणीसाठा शिल्लक नसल्याने प्रकल्पावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत़ या प्रकल्पांतर्गत गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला इतर तालुक्यातून पाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे़सेलू तालुक्यासह परभणी, पूर्णा, मानवत या तालुक्यांमधील गावांची तहान भागविणाऱ्या निम्न दूधना प्रकल्पात सध्या १़९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे़ मागील वर्षीच्या उन्हाळ्यात या चारही तालुक्यांना निम्न दूधना प्रकल्पाने तारले होते़ यावर्षी देखील निम्न दूधना प्रकल्पातून परभणी आणि पूर्णा या दोन शहरांसाठी पाणी घेण्यात आले आहे़ परंतु, आता प्रकल्पातच पाणीसाठा शिल्लक नसल्याने टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे़ ३४४ दलघमी क्षमतेच्या या प्रकल्पांमध्ये केवळ ४़६ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे़
परभणी: १६ प्रकल्पांमधील जीवंत जलसाठा संपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 1:05 AM