लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परिसरात वीज वितरण कंपनीने वर्दळीच्या रस्त्याच्या कडेला टेम्पोमध्ये विद्युत रोहित्र ठेऊन वीजपुरवठा सुरु केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. याकडे अधीक्षक अभियंत्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.वीज वितरण कंपनीकडून औद्योगिक, घरगुती, कृषी व वाणिज्य अशा जवळपास ३ लाख वीज ग्राहकांच्या वीजपुरवठा केला जातो. या वीज ग्राहकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्ह्यात १० उपविभागांची निर्मिती करण्यात आली; परंतु, मागील काही दिवसांपासून या उपविभागांसह वीज वितरण कंपनीचा कारभार ढेपाळला आहे. परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रंथालय इमारतीच्या पाठीमागील वर्दळीच्या रस्त्याच्या कडेला विद्युत रोहित्र उभारण्यात आले होेते. मात्र हे विद्युत रोहित्र अचानक जळाले. त्यामुळे विद्यापीठ परिसरातील वीज खंडित झाली. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या वतीने एम.एच.१४ एफ ३८१९ या क्रमांकाच्या टेम्पोमध्ये विद्युत रोहित्र ठेऊन वीजपुरवठा सुरळीत केला आहे. तीन ते चार दिवसांपासून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोमधील विद्युत रोहित्रामधून वीजपुरवठा सुरु आहे. हा विद्यापीठातील प्रमुख रस्ता असल्याने या ठिकाणी २४ तास वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक व वाहनधारक आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. मागील तीन दिवसांपासून नवीन विद्युत रोहित्र या ठिकाणी बसविण्यात आले नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीचा कारभार ढेपाळला असल्याचे दिसून येत आहे. याकडे महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.विद्युतरोहित्र : जळण्याचे प्रमाण वाढले४मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांसह गावठाणाला वीज वितरण कंपनीकडून देण्यात येणारे विद्युत रोहित्र दोन ते तीन दिवसात जळत असल्याचा प्रकार परभणी तालुक्यातील जांब, वांगी या ठिकाणी घडला आहे.४दुरुस्ती व नवीन विद्युतरोहित्र जळण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे महावितरणकडून विद्युत रोहित्र ने-आण करण्याचा खर्चही देण्यात येतो.४मात्र संबंधित एजन्सीकडून मागील काही दिवसांपासून ने-आण करण्याचे पैसे ही दिले जात नाहीत. त्यामुळे वीज ग्राहकांना आर्थिक फटका सहन करीत गैरसोयीचाही सामना करावा लागत असल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत.टेम्पोमधील विद्युत रोहित्राचा नागरिकांच्या जिवाला धोका नाही. टेम्पोमधील विद्युत रोहित्राचा वीजपुरवठा खंडित करून त्या ठिकाणी नवीन विद्युत रोहित्र बसविण्यात येणार आहे. त्या ठिकाणचे विद्युत रोहित्र दुुरुस्तीसाठी नेण्यात आले आहे. दुरुस्तीला वेळ लागला आहे. उद्यापर्यंत त्या ठिकाणी नवीन विद्युत रोहित्र बसविण्यात येऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.- राजेश लोंढे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण
परभणी : महावितरण कंपनीकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 12:42 AM