लोकमत न्यूज नेटवर्कताडबोरगाव (परभणी): येथील आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीची दुरवस्था झाल्याने चार वर्षांपासून या उपकेद्राला कुलूप आहे़ आरोग्य विभागाने पर्यायी सुविधा उपलब्ध करून न दिल्याने आरोग्य सुविधा कोलमडली असून, छोट्या आजारावरील उपचारासाठीही रुग्णांना शहरी भागात धाव घ्यावी लागते़कोल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ताडबोरगाव येथे आरोग्य उपकेंद्र असून, या उपकेंद्राची इमारत ५० ते ६० वर्षे जुनी आहे़ चार वर्षांपासून तर इमारतीची दुरवस्था वाढली आहे़ त्यामुळे या इमारतीला चक्क कुलूप लावण्यात आले आहे़ आरोग्य परिचारिकाही गावाकडे फिरकत नाही़ त्यामुळे सर्दी, ताप, खोकला यासारख्या छोट्या आजारांच्या रुग्णांनाही उपचारासाठी शहरातील दवाखाने गाठावे लागत आहेत़त्यासाठी रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे़ सध्या डेंग्यूच्या आजाराने अनेक जण त्रस्त असून, या रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार करावे लागत आहेत़आरोग्य उपकेंद्रामधून प्रसुतीपूर्व आरोग्य तपासणी, किरकोळ, साध्या व मध्यम आजारावर उपचार, माता आणि बाल आरोग्य सेवा, क्षय, हिवताप आणि कुष्ठरोग तपासणी, औषधोपचार आणि आरोग्य शिक्षण आदी आरोग्य सेवा पुरविल्या जातात़ मात्र इमारतीची दुरवस्था झाल्याने आणि परिचारिकाही उपकेंद्रात येत नसल्याने आरोग्य सेवा कोलमडली आहे़परिचारिकेचे पद रिक्त४येथील परिचारिका प्रशिक्षणासाठी गेल्याने परिचारिकेचे एक पद रिक्त आहे़ या पदाचा पदभार इतर परिचारिकांकडे दिला असून, या परिचारिकांना तीन ते चार गावांचे कामकाज पाहावे लागत आहे़४त्यामुळे एक-एक महिना परिचारिका उपकेंद्रात येत नाहीत़ याशिवाय बहुउद्देशीय कार्यकर्ता देखील गावात फिरकत नसल्याने आरोग्य सेवा कोलमडली आहे़खर्च गेला पाण्यातउपकेंद्राच्या इमारती शेजारीच प्रसुतीगृहाची इमारत बांधण्यात आली आहे़ स्त्रियांची बाळंतपणे सोपी व्हावीत, या उद्देशाने आरोग्य विभागाने लाखो रुपयांचा खर्च करून प्रसुतीगृहाची उभारणी केली खरी; परंतु, उपकेंद्रच बंद असल्याने या परिसराला कचरा कुंडीचे स्वरुप प्राप्त झाले आहे़ त्यात प्रसुतीगृहाची अवकळा झाली असून, लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे़येथील अंगणवाडी केंद्रात नियमित लसीकरण व रुग्णांची तपासणी केली जाते़ मी स्वत: येथे भेट देऊन आरोग्य तपासणी करते़-डॉ़ पद्मा जोशी, वैद्यकीय अधिकारीताड बोरगाव येथील नवीन उपकेंद्राच्या इमारतीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करीत असून, लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल़-विष्णू मांडे, जिल्हा परिषद सदस्य
परभणी : चार वर्षांपासून आरोग्य केंद्राला कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 12:06 AM