ज्ञानेश्वर भाले
परभणी : लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात शिवाजीराव देशमुख वगळता आजपर्यंत कुणालाच तिसऱ्यांदा खासदार होता आले नाही. पण या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव सेनेचे उमेदवार खासदार संजय जाधव यांना देशमुख यांच्या हॅट्रिकशी बरोबरी करण्याची संधी आहे. तर दुसरीकडे महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे परभणीतून बाजी मारणार का? याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
उद्धव सेनेचे जाधव प्रत्येकी दोन वेळा आमदार, खासदार असल्याने त्यांची मतदार संघावर पकड आहे. तर दुसरीकडे रापसच्या जानकर यांच्या पक्षाचा मतदार संघात एक आमदार असून महायुतीचे आमदार, पदाधिकारी त्यांच्या विजयासाठी राबताना दिसत आहेत. निवडणुकीच्या रिंगणात एकूण ३४ उमेदवार आहेत. वंचितने ऐनवेळी इथून उमेदवार बदलला. हा उमेदवार किती मते घेणार म्हणजेच कुणाची आणि किती मते खाणार हा मुद्दा देखील कळीचा ठरणार आहे. यावरच विजयी कोण होणार हे ठरेल, अशीच सध्याची परिस्थिती आहे.
राजकीय पक्षाचे चिन्ह या निवडणुकीतून गायबराज्यातील राजकीय घडामोडींमुळे ४० वर्षानंतर शिवसेनेचा धनुष्यबाण तर २५ वर्षानंतर राष्ट्रवादीचे प्रचलित घड्याळ चिन्ह या निवडणुकीतून गायब झालेत. त्यामुळे मतदारांना आपले मत देण्यासाठी योग्य उमेदवार आणि त्याच्या नवीन चिन्हाची ओळख करून घेत मतदान करावे लागणार आहे. परभणी मतदार संघामधील सहा विधानसभा क्षेत्रातील १ हजार ३०० गावात निवडणूक रिंगणातील ३४ उमदेवारांना त्यांचे नवीन चिन्ह घेऊन जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. यात १३ उमेदवार विविध पक्षाचे तर २१ जण अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
जिल्ह्यातील सिंचनाचे प्रश्न प्रलंबित असून कृषी विद्यापीठात अनेक प्रश्नांवर सकारात्मक विचार झालेला नाही, त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही. रेल्वे जंक्शन विकास, नवीन प्लॅटफाॅर्म निर्मिती, पुर्णा येथील डिझेल लोकोशेड, यार्डचा प्रश्न, दुहेरीकरणाचे परभणी-जालना मार्गाचे काम अपेक्षित. मनपातंर्गत रस्ते, भुमिगत गटार योजना, नाट्यगृह निर्मितीचा निधी, नवीन औद्योगिक वसाहत, समांतर जलवाहिणीचा प्रश्न मार्ग लागणे आवश्यक. भाजपचे पक्ष फोडाफोडीचे राजकारण, प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून विरोधकांची कोंडी आदी.
अनेक नेतेमंडळींच्या अपेक्षांवर पाणी अजित पवार गटाने जागा रासपला सोडल्याने धनुष्यबाण आणि घड्याळ चिन्ह असणाऱ्या मतदार संघातील अनेक बड्या पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. महायुतीचे जानकर यांचे प्रभाव क्षेत्र मतदार संघात नाही. वरिष्ठ पातळीवरून जातीय समीकरणे जुळवत त्यांना जागा सोडण्यात आली आहे.