लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यातील लेंडी नदीच्या पात्रात दोन ठिकाणी कमी उंचीच्या पुलाचा १२ गावांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. यावर्षी झालेल्या पावसाळ्यात या पुलामुळे ३० वेळा या गावांचा शहराशी संपर्क तुटला होता. तरीही प्रशासनाकडून पुलांच्या प्रश्नाकडे नेहमीच डोळेझाक केली जात आहे.पालम शहराजवळ अर्धा कि. मी. अंतरावरून लेंडी नदी वाहते. या नदीच्या पात्रात पालम ते जांभुळबेट या रस्त्यावर जुनाट आणि अतिशय कमी उंचीचा पूल असल्याने पाऊस पडताच हा रस्ता बंद पडतो. यावर्षी ३० वेळा हा रस्ता बंद पडला आहे. या रस्त्यावर फळा, सोमेश्वर, घोडा, आरखेड, उमरथडी, खुरलेवाडी तसेच निसर्गरम्य पर्यटनस्थळ जांभूळबेट आहे.पाऊस पडताच पुलावर पाणी येऊन हा रस्ता वाहतुकीसाठी बंद पडत आहे. सलग आठ दिवस हा रस्ता बंद पडून पालम शहराचा संपर्क तुटला होता. याच नदीवर पालम ते पुयणी या रस्त्यावरही शासनाने नवीन पुलाचे बांधकाम केले आहे.अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे नवीन पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे या ठिकाणी ही पाऊस पडताच पुलावर दोन ते तीन फूट पाणी येऊन रस्ता बंद पडत आहे. या रस्त्यावरील पुयणी, आडगाव, वनभुजवाडी, तेलजापूर, नाव्हा, खडी या गावांची वाहतूक ठप्प होत आहे. दोन्ही ठिकाणी कमी उंचीचे पूल असून दरवर्षी पावसाळ्यात या १२ गावांना त्रास सहन करावा लागत आहे. एवढे होऊनही शासकीय यंत्रणा मात्र नवीन पुलांच्या कामाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे पावसाळ्यात १२ गावांना मोठ्या प्रमाणामध्ये संकटाचा सामना करावा लागत आहे.प्रशासन : गप्पच४यावर्षीच्या पावसाळ्यात या पुलामुळे ३० वेळा या गावांचा शहराशी संपर्क तुटला होता. तरीही प्रशासनाकडून पुलांच्या प्रश्नाकडे नेहमीच डोळेझाक केली जात आहे. परिणामी बारा ते तेरा गावातील ग्रामस्थांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.४विशेष म्हणजे, मागील अनेक वर्षापासून या पुलाचा प्रश्न रेंगाळला असला तरीही अद्यापपर्यंत जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या अडचणीत भर पडत आहे.लेंडी पुलाचाविकास आराखडा पडला धूळ खात४जिल्हा प्रशासनाने जांभुळबेटच्या विकासासाठी बनविलेल्या विकास आराखड्यामध्ये लेंडी नदीच्या पात्रातील पुलाच्या कामासाठी १ कोटी ५० लाख रुपये नियोजित केले आहेत. मात्र मागील एक वर्षापासून हा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयात धूळ खात पडलेला आहे. शासनाच्या विभागातील विविध कार्यालय अंदाजपत्रके देत नसल्याने विकास आराखडा शासनाकडे पाठविण्यात आलेला नाही. त्यामुळे पुलाचा प्रश्नही रेंगाळला असून शासकीय यंत्रणेच्या कचखाऊ कारभाराचा फटका या भागातील ग्रामस्थांना बसत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलत ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
परभणी : कमी उंचीच्या पुलाचा १२ गावांना होतोय त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 10:56 PM