लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात अज्ञाताने गवत पेटवून दिल्याने मोठी झाडे जळाल्याचा प्रकार घडला आहे. तर अनेक झाडांना क्षती पोहचल्याने या झाडांची वाढ खुंटण्याची भीती व्यक्त होत आहे. विद्यापीठ परिसरात यापूर्वीही झाडे तोडण्याचा प्रकार झाला होता. आता झाडे जळाल्याने सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.परभणी शहरातील कृषी विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. दरवर्षी या ठिकाणी नवीन झाडे लावली जातात. परंतु, या झाडांच्या देखभाल दुरुस्तीकडे अलीकडच्या काही महिन्यांपासून दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून जाणाऱ्या रस्त्याने रेल्वेगेट जवळ काही वर्षांपूर्वी नव्याने झाडे लावली होती. या परिसरात मोठ्या प्रमाणात वाळलेले गवतही वाढले होते. हे गवत कोणीतरी पेटवून दिले आणि गवताबरोबरच उंच वाढलेली झाडेही जळाली आहेत. तसेच या ठिकाणी नवीन रोपे तयार केली होती. या घटनेत ही रोपेही जळून गेली आहेत. ही आग नेमकी कोणी लावली, याची माहिती मिळू शकली नाही. परंतु, आगीमध्ये झाडांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विद्यापीठ परिसरात यापूर्वी देखील झाडे तोडण्याचा प्रकार घडला होता. कुठलीही परवानगी न घेता विद्यापीठातील झाडांची कटई झाल्याचा आरोप त्यावेळी झाला होता. हा प्रकार ताजा असतानाच आता ही घटना घडल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
परभणी : कृषी विद्यापीठातील अनेक झाडे गेली जळून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:23 AM