परभणी : भारतीय चलनातील बनावट नोटा बनविण्याच्या साहित्यासह दोघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई शनिवारी सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान करण्यात आली. शहरातील स्टेशन रोड शाही मस्जिद जवळ किरायाच्या खोलीमध्ये राहत असलेल्या दोघांना या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून विविध प्रकारचे साहित्य आणि मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात शनिवारी मध्यरात्री गुन्हा नोंद करण्यात आला.
याबाबत माहिती अशी, यातील दोन आरोपीतांनी संगणमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी भारतीय चलनाच्या बनावट नोटा बनविण्याचे साहित्य त्यांच्या किरायाने केलेल्या रूममध्ये बाळगल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार फिर्याद दिली आहे. ज्यामध्ये गणेश उर्फ गणि प्रकाश पांढरे (रा.शिवाजीनगर, माजलगाव, ह.मु.आयेशा कॉटेज) आणि शेख अदनान शेख नमुन (रा.हबीब नगर, पालम, ह.मु.आयेशा कॉटेज) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला. शनिवारी सायंकाळी या ठिकाणी पोलीस पथक गेले असता त्यांना विविध प्रकारचे साहित्य आढळून आले. सदरील साहित्य जप्त करून त्यांना ताब्यात घेत चौकशी करण्यात आली. यामध्ये नोटा तयार करण्यासाठी लागणारे बॉण्ड पेपर, शाई, प्रिंटर, काही बनावट नोटा असे साहित्य मिळून आले. या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार, अंमलदार सुधाकर कुटे, संतोष सानप, सुसे, काळे यांनी भेट दिली होती.
नवा मोंढा ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रिंटर चोरीच्या तपासामध्ये नवा मोंढा ठाण्याचे पोलीस कर्मचारी पंकज उगले, देशपांडे, वियज बद्दर, दैठणकर हे पुढील तपासासाठी व चोरी निष्पन्न करण्यासाठी गेले असता त्यांना माहिती मिळाली. यावरून नानलपेठ आणि नवा मोंढा अशा दोन्हीही पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये सखोल तपास केल्याने बनावट नोटा प्रकरणात साहित्य जप्त करून दोघांना ताब्यात घेण्यात आले.- रवींद्रसिंह परदेशी, पोलीस अधीक्षक