लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी सध्या संकटात असून त्यांना दिलासा देण्याऐवजी जिल्ह्याचे संपर्कमंत्री बबनराव लोणीकर व पालकमंत्री गुलाबराव पाटील हे गायब झाले आहेत. ते जिल्ह्यात येत नसल्याने शेतकऱ्यांमधून संतापाची भावना निर्माण झाली आहे.अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील साडेतीन लाख हेक्टर जमिनीवरील खरीपातील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून सुरु आहेत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. असे असताना संकटातील शेतकºयांना दिलासा देण्याचे काम लोकप्रतिनिधींचे आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यात दौरा करुन शेतकºयांना दिलासा दिला; परंतु, शिवसेनेचेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र जिल्ह्याकडे पुर्णत: पाठ फिरवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पालकमंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्यात जावून नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मराठवाड्यातील परभणी वगळता सातही जिल्ह्यांमधील पालकमंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली. एकमेव परभणी जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी पालकमंत्र्यांनी केलेली नाही. त्यामुळे असे पालकमंत्री काय कामाचे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.शिवसेनेच्या पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केले तरी निवडणुकीपर्यंत जिल्ह्याचे संपर्कमंत्री बबनराव लोणीकर यांचा जिल्ह्यात राबता होता. विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आणि संपर्कमंत्री लोणीकर हे गायब झाले. त्यांनी त्यांच्या जालना जिल्ह्यातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली; परंतु, संपर्कमंत्री म्हणून परभणीचा दौरा करण्याची तसदी त्यांना घ्याविशी वाटली नाही. विशेष म्हणजे दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडण्यासाठी विरोध करुन आंदोलन करणारे लोणीकर हेच होते. त्यावेळी लोणीकर यांच्या भूमिकेविषयी नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. आताही शेतकरी संकटात असताना लोणीकर हे गायब झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.काँग्रेस- राष्ट्रवादीचे नेतेही दूरच४जिल्ह्यातील पीक परिस्थितीची पाहणी करण्याकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचेही दुर्लक्ष झाल्याचे पहावयास मिळत आहेत. राज्यस्तरावरील केवळ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली आहे. भाजपा, राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते मात्र यापासून दूरच आहेत.
परभणी : संपर्कमंत्री अन् पालकमंत्र्यांनीही शेतकऱ्यांना वाºयावर सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 11:39 PM