लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पाथरी येथील शेख सौरभ शेख अमजद यांच्याकडील १२ लाख १६ हजार २०० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटणाºया टोळीविरूद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे़१४ फेब्रुवारी रोजी शेख सौरभ शेख अमजद हे दुकान बंद करून घरी जात असताना चोरट्यांनी त्यांचा पाठलाग करून रक्कम व दागिने लुटले होते़ चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात शेख सौरभ व त्यांचा नोकर जखमी झाला होता़ या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या पथकाने तपास करून या प्रकरणातील आरोपी किरणसिंग हत्यारसिंग टाक (इंदिरानगर, अहमदपूर जि़ लातूर), रुपसिंग चतुरसिंग टाक (सरगमनगर, सोलापूर), गौतम भगवान आदमाने (सारोळा ता़ पाथरी) आणि प्रताप मधुकर मस्के (आर्वी) या चौघांना अटक केली़ त्यांच्याकडून ६ लाख रुपयांचे दागिने, नगदी ८० हजार रुपये जप्त केले होते़दरम्यान, या टोळीने २०१० ते २०१९ या ९ वर्षांत जिंतूर, पालम, पाथरी, कळमनुरी, हिंगोली, परळी आदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा, खून, जबरी चोरी असे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले़ या टोळीविरूद्ध १८ गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले़ त्यामुळे पोलीस निरीक्षक डी़डी़ शिंदे यांनी या प्रकरणात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचे कलम समाविष्ट करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे पाठविला होता़ पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी हा प्रस्ताव नांदेड परिक्षेत्राच्या विशेष महानिरीक्षकांकडे पाठविला़ विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांनी या प्रकरणाची पडताळणी करून ही शिफारस मंजूर करीत १३ एप्रिल रोजी मोक्का अंतर्गत कलमांचा समावेश करण्यास मान्यता दिली आहे़चार महिन्यांत चौथी कारवाईजिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी टोळ्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मोक्का कायद्या अंतर्गत मागील चार महिन्यांत ही चौथी कारवाई करण्यात आली आहे़ या पूर्वी पूर्णा येथील टोळीप्रमुख सोमनाथ सोलव याच्या टोळीतील २१ आरोपी, चारठाणा येथील टोळी प्रमुख हरिश सुभाष पवार याच्या टोळीतील ८ आणि कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत सुभाष बापूराव गुजर याच्या टोळीतील १२ आरोपींविरूद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे़ या गुन्ह्यातील काही आरोपी औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात असून, काही आरोपी अद्यापही गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीस कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली़
परभणी : सोनारास लुटणाऱ्या टोळीविरुद्ध मोक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 12:08 AM