लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : भाजपाचे मुंबई येथील आ़ राम कदम यांनी गोकुळ आष्टमीच्या दिवशी मुलींना पळवून आणण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या वतीने परभणीत निषेध करीत आंदोलन करण्यात आले़ त्यानंतर याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले़महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दुपारी १२ च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपाचे आ़ राम कदम यांच्या छायाचित्रास काळे फासून जोडेमारो आंदोलन करण्यात आले़ त्यानंतर प्रशासनास मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ त्यामध्ये राम कदम यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली़ कदम यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा भाजपाच्या एकाही मंत्र्याला किंवा आमदार, खासदारांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे़ यावेळी परभणी शहर अध्यक्ष सचिन पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुशीलाताई चव्हाण, अर्जुन टाक, बालाजी मुंडे, दिलीप डहाळे, अमोल देवठाणकर, उत्तम चव्हाण, वेदांत पुरंदरे, शुभम टेहरे, राधेय सातोनकर, धीरज निर्वळ, अर्जुन राठोड, कुणाल कुलकर्णी, सय्यद यासीन आदींची उपस्थिती होती़राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने शहराध्यक्षा नंदाताई राठोड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी भवनसमोर आंदोलन करण्यात आले़ यावेळी आ़ राम कदम यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला़ त्यानंतर प्रशासनाला याबाबत कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले़ यावेळी शहराध्यक्षा नंदाताई राठोड यांच्यासह रेखाताई आवटे, मन्नूना शेख, संगीता पवार, विद्या जोंधळे, रुबिना शेख, राधाबाई जोंधळे, आशाबाई कांबळे, शीला मस्के, आसेफा शेख, प्रयागबाई पवळे, शशिकला गायकवाड आदींची उपस्थिती होती़
परभणी : कदम यांच्या वक्तव्याविरोधात राकाँ, मनसेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 12:50 AM